शिवसेनेच्या दणक्यानंतर जेएसडब्लूने ओरिसा येथील भरती प्रक्रिया केली रद्द

25

सामना प्रतिनिधी । अलिबाग

वडखळ येथील जेएसडब्ल्यु कंपनीने 600 जागांसाठी परस्पर ओरीसा – भूवनेश्‍वर येथे घेतलेली भरती प्रक्रिया अखेर अलिबाग शिवसेनेच्या दणक्याने रद्द केली. शिवसेनेचे तालुका प्रमुख राजा केणी आणि पदाधिकारी यांच्यासह कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या शनिवारी (ता. १२) रोजी पाच तास चाललेल्या बैठकीत कंपनी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. आता ही भरती प्रक्रिया नव्याने घेतली जाणार असून यामध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळणार आहे. शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे स्थानिकांना नोकरी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

जेएसडब्लू कंपनी प्रशासनाबरोबर शिवसेना शिष्टमंडळाची भरती प्रक्रियेबद्दल आज शनिवारी सकाळी ११.०० वाजता बैठक सुरू झाली. या बैठकीला जेएसडब्लूचे व्हॉईस प्रेसिडेंट एस. एम. सोनुके, जनरल मॅनेजर आत्माराम बेटकेकर, तर अलिबाग शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजा केणी आणि कामगार नेते दीपक रानवडे यांच्या नेतृत्वाखाली शहर प्रमुख संदीप पालकर, संघटक सतीश पाटील, माजी तालुकाप्रमुख नरेश म्हात्रे, उपतालुकाप्रमुख प्रकाश पाटील, विभागप्रमुख योगेश जुईकर, गुरुनाथ म्हात्रे, उपतालुकाप्रमुख अजित पाटील, विभागप्रमुख संदेश पालकर, शहापूर शाखाप्रमुख ज्ञानेश्वर थळे, कुसुंबळे ग्रामपंचायत सदस्य महेश वावेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते मनोहर पाटील, कौतुक पाटील उत्तम पाटील, आप्पा पिंगळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांनी कंपनी अधिकाऱ्यांना चागलेच धारेवर धरले होते. अखेर ओरिसा येथील भरती प्रक्रिया रद्द करण्यास प्रशासनाला भाग पाडण्यात आले. पाच तास चाललेल्या या बैठकीत रोजगराबद्दल सखोल चर्चा झाली.

जेएसडब्ल्यु कंपनीने 29 आणि 30 डिसेंबर या दोन दिवस ओरीसा-भूवनेश्‍वर येथे मुलाखती घेतल्या होत्या. टर्नर, फिटर, क्रेन ऑपरेटर, वेल्डर, इलेक्ट्रिशन अशा पदांसाठी एकूण 600 जागांसाठी ही भरती प्रक्रिया परस्पर ओरीसा येथे घेण्यात आली होती. या विरोधात शिवसेनेने कंपनी प्रशासनाला गेट रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार कंपनी व शिवसेना शिष्टमंडळ यांच्यात भरती प्रक्रियेबाबत आज बैठक संपन्न झाली.

ओरिसा येथे झालेल्या मुलाखतीची ही प्रक्रिया रद्द करण्यात येत असल्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने शिवसेना शिष्टमंडळाला दिले. त्यानंतरच दुपारी ३.०० वाजता ही बैठक संपविण्यात आली. ओरिसा येथील भरती प्रक्रियेबद्दल येथील स्थानिक बेरोजगार तरूणांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. पण शिवसेनेच्या दणक्याने जेएसडब्लू प्रशासन नमले असून भरती प्रक्रियाच रद्द केली असल्याने स्थानिकांच्या नोकरीचा प्रश्न शिवसेनेमुळे सुटणार आहे.

ज्या जागा भरण्यात येत आहेत, त्या जागांसाठी येथे शैक्षणिक पात्रता असलेले स्थानिक तरुण असताना त्यांना सातत्याने डावळले जाणे योग्य नाही. आता ही भरती रीतसर स्थानिक वृत्तपत्रातून जाहिरात दिल्या नंतर होणार आहे. स्थानिकांच्यावर कोणी अन्याय करीत असेल, तर त्याला अशा प्रकारे सडेतोड उत्तर दिले जाईल. – राजा केणी, तालुकाप्रमुख, अलिबाग

आपली प्रतिक्रिया द्या