मायलेज बघण्याचा बनाव करून दुचाकीच पळवली,करोडपती पालकांच्या मुलाला बाईक चोरी प्रकरणात अटक

मायलेज बघण्याच्या बहाण्याने राऊंड मागून एका तरुणाची दुचाकी घेऊन पसार झालेल्या हैदराबाद येथील कोटय़धीश घरातल्या जुबेर इरफान सय्यद (26) याला विनोबा भावे पोलिसांनी पकडले आहे. दोन दिवसांसाठी मुंबईत आलेल्या जुबेरने नशेत हे कृत्य केल्याचे समजते. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हैदराबाद येथील बंजारा हिल या उच्चभ्रूंच्या वस्तीत राहणारा जुबेर दोन दिवसांपूर्वी मुंबईत आला होता. तो विक्रोळी येथे एका हॉटेलमध्ये थांबला होता. दरम्यान, मंगळवारी तो कुर्ला परिसरात आला असता त्याला नीलेश आगरथडे या तरुणाची मॉडीफाय केलेली दुचाकी दिसली. त्यामुळे नीलेशच्या मागेमागे तो कुर्ल्यातील एका सलूनमध्ये गेला. केस कापून नीलेश बाहेर आल्यानंतर जुबेरदेखील त्याच्या मागे आला आणि तुझी दुचाकी मस्त आहे. माझ्याकडेदेखील अशी आहे. जरा तुझ्या दुचाकीचा मायलेज तपासायचा असून एक राऊंड दे, अशी मागणी त्याने केली. तेव्हा नीलेशने त्याला एक राऊंड दिला असता जुबेर दुचाकी घेऊन पसार झाला. त्यामुळे नीलेशने विनोबा भावे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तायडे, जितेंद्र सपकाळे तसेच खरटमल, सुनील पाटील, अनिल शिंदे आणि उबाळे या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक बाबीचा अभ्यास करून पोलिसांनी जुबेरला 12 तासांच्या आत पकडले.

जुबेरची आई हैदराबादमध्ये मोठी वकील आहे. त्याचे कुटुंबीय कोटय़धीश असून तो बंजारा हिलसारख्या उच्चभू वस्तीत राहतो. शिवाय जुबेर स्वत बी. टेकपर्यंत शिकलेला आहे. असे असतानाही त्याने असे कृत्य का केले याचा पोलीस शोध घेत आहेत. त्याने दुचाकी पळवली तेव्हा तो एमडीच्या नशेत होता असे पोलीस सूत्रांकडून समजते.

चलानच्या जोरावर पोलिसांनी शोधून काढले

दुचाकी घेऊन जुबेर पसार झाला, पण हेल्मेट नसल्याने सहार येथे दुचाकीच्या नंबरवर चलान झाले. त्यानंतर दिंडोशी येथे दुसरे चलान झाले. त्या चलानच्या आधारे पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. पण दिंडोशीला पोहचेपर्यंत तो तेथून सटकला होता. तेथून परतत असताना कुर्ला येथे एक संशयित तरुण पथकाला दिसला. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तोच जुबेर असून त्याने दुचाकी घेऊन पसार झाल्याची कबुली दिली.

आपली प्रतिक्रिया द्या