लश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी

625

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात उद दावाचा म्होरक्या दहशतवादी हाफीज सईदने लाहोरच्या उच्च न्यायालयात टेरर फंडिंगप्रकरणी आपल्याला अटक करण्यात आल्याच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. संयुक्त राष्ट्रांनी हाफीज सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. मात्र, टेरर फंडिग प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 67 आरोपींचा आणि आपला लश्कर या संघटनेशी संबंध नसल्याचे सांगत त्याने कोलांटीउडी मारली आहे. सईदला 17 जुलैला टेरर फंडिगप्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणी 2 सप्टेंबरपासून सुनावणी सुरू होणार असून त्याला लाहोरच्या तुरुंगात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे.

हाफीज सईद आणि टेरर फंडिग प्रकरणी अटक केलेल्या फलाह ए इन्सानियतच्या 67 जणांनी अटकेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आपला आणि लश्करचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. याबाबत इतर न्यायालयानी दिलेल्या निर्णयाचा त्यांनी हवाला दिला आहे. ज्या संपत्तीची उल्लेख करण्यात आला आहे, त्याचा उपयोग मशीद निर्माणासाठी करण्यात येतो. त्याच्यावर कोणतेही नियमांचे बंधन नाही. त्यामुळे लश्करशी आपला संबंध नसल्याचे न्यायालयाने घोषित करावे अशी मागणी सईदने केली आहे. तसेच आपल्यावर दाखल करण्यात आलेला एफआयआर कायद्याचे पालन न करता तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे तो रद्द करावा अशी मागणीही सईदने केली आहे. जमात उद दावा ही लश्करची संघटना आहे. या संघटनेकडूनच डिसेंबर 2008 मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांनी या संघटनेवर बंदी घातली आहे. तसेच अमेरिकेने सईदवर एक कोटी डॉलरचे बक्षीत घोषित केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या