शेवगाव दंगलीची न्यायालयीन चौकशी करावी – माजी खासदार हुसेन दलवाई

शेवगाव तालुक्यामध्ये घडलेल्या दंगलीसंदर्भात पोलीस प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचे दिसून आले असून आता पोलिसांनी त्या ठिकाणी पुन्हा दहशत करून सर्वसामान्यांना वेठीस धरलेले आहे. या दंगलीची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी आपण राज्याचे मुख्यमंत्री यांना करणार असल्याचे काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. सध्या राज्यात घडत असलेल्या अशा प्रकारच्या घटना पाहता महाराष्ट्राचा गुजरात करण्याचा काहींचा प्रयत्न आहे की काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेवगाव तालुक्याच्या घडलेल्या प्रकारामध्ये संबंधित पोलीस निरीक्षकाला तात्काळ निलंबित करावे, अशी मागणीसुद्धा त्यांनी केली आहे.

शेवगाव दंगलीची पाहणी केल्यानंतर नगर येथे शासकीय विश्रामगृहावर माजी खासदार दलवाई बोलत होते. यावेळी शौकत तांबोळी, इरफान इंजिनियर ,संध्या म्हात्रे, सय्यद वहाब, खलील सय्यद, आजीमराजे आदी यावेळी उपस्थित होते.

हुसेन दलवाई म्हणाले की, शेवगावमध्ये दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी बळाचा वापर या ठिकाणी अगोदर केलेला होता. संबंधित पोलीस निरीक्षक पुजारी याच्या संदर्भात अनेकांनी तक्रारी केलेल्या होत्या; पण त्याची कुणीच दखल घेतली नव्हती, जर त्या वेळेला योग्य ती दखल घेतली असती तर असे प्रकार घडले नसते असे सांगून पोलिसांची निष्क्रियता आता दिसून आलेली आहे. त्यामुळे या प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस निरीक्षकाला तात्काळ निलंबित केले पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले. शेवगाव घटनेच्या संदर्भामध्ये न्यायालयीन चौकशी तात्काळ केली पाहिजे, अशी मागणीसुद्धा आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शेवगावमधील परिस्थिती पाहता ही दंगल घडवण्यात आलेली आहे, असा गंभीर आरोपसुद्धा त्यांनी यावेळी केला. विशेष म्हणजे पोलिसांनी विनाकारण अनेकांची नावे त्यामध्ये घातली आहेत. विशेष म्हणजे दोन मृत व्यक्तिंची नावे यामध्ये घालण्यातसुद्धा पोलिसांनी मागेपुढे पाहिले नाही. हा अतिशय गंभीर प्रकार हा या ठिकाणी घडलेला असला तरीही कोणीही याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही. एक प्रकारे महाराष्ट्राच्या पोलीस विभागाला बदनाम करण्याचा प्रकार नगर जिल्ह्यामध्ये झाला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही असेही ते म्हणाले.

या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम या ठिकाणी झाले आहे. राज्यात अगोदर असे कुठे घडले नसेल तर या ठिकाणी झाले असल्याचे ते म्हणाले. वास्तविक पाहता जिल्ह्यामध्ये शांतता कशी राहील हे पाहण्याची जबाबदारी जिल्हा पोलीस अधीक्षकांची आहे, मात्र येथे तसे झालेले दिसत नाही, असेही त्यांनी सांगून घडलेली घटना अतिशय गंभीर आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या राज्यांमध्ये अशा प्रकारच्या घटना होत असेल तर आता वेळीच सावध होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

ज्यांची नावे या गुन्ह्यामध्ये घेतली आहेत त्यांच्या घरी रात्री बेरात्री जाऊन तेथील लोकांना दहशत निर्माण करून पोलिसांनी बळाचा वापर केला आहे. असे भयंकर कृत्य या नगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले. एक प्रकारे पोलिसांनी या ठिकाणी अजूनही दहशत माजवण्यााच प्रकार केला आहे, असा अनुभव त्यांनी यावेळी आला. हे सर्व होत असताना पोलिसांनीसुद्धा स्वत:च्या मर्यादा या ओळखल्या गेल्या पाहिजे व सर्वसामान्य लोकांना त्रास होणार असेल तर नगर जिल्ह्यामध्ये कायदा सुविधा राहिली की नाही, हा सुद्धा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. असेही ते म्हणाले, अशा एक अनेक घटना पाहता व राज्यभरामध्ये सुरू असलेले असे प्रकार पाहता महाराष्ट्राचा गुजरात करण्यासाठी आता कुणीही अशा पद्धतीने सवाल दलवाई यांनी उपस्थित केला.

नगरचे नामांतर म्हणजे ओबीसी वर्गाला चॉकलेट दाखवण्याचा प्रकार

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचा विषय घेण्यात आला त्यांच्या नावाला आम्ही विरोध करणार नाही. होळकर या शूरवीर होत्या, लढाऊ होत्या. इंदोरला त्यांचे वास्तव्य असल्याने त्या नगरीला त्यांचे नाव दिले गेले पाहिजे, असे हुसेन दलवाई यांनी सांगितले. नगर येथे येऊन नामांतर केले म्हणजेच एक प्रकारे ओबीसी समाजालाच आरक्षण देण्याचा मुद्दा बाजूला ठेवून अशा प्रकारचे चॉकलेट दिले गेले, अशी टीकाही दलवाई यांनी केली. 9 वर्षांमध्ये या सरकारने नेमके सर्वसामान्य जनतेला काय दिले हे सांगावे, असे आवाहनही त्यांनी केले. ‘मन की बात’ ही फक्त तुमच्या पुरतीच मर्यादित राहिली असे सांगून, त्याचा सर्वसामान्यांना काय उपयोग झाला, हे पण सांगा असे आवाहनही दलवाई यांनी केले.