मोदी–शहा पोलीस यंत्रणा अस्थिर करतायत! अस्थाना यांच्या दिल्ली नियुक्तीवरून ज्युलियो रिबेरो यांनी सुनावले खडे बोल

गुजरात कॅडरचे वादग्रस्त आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना यांची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी केंद्र सरकारने नियुक्ती केल्यामुळे देशभरातील माजी पोलीस अधिकारी संताप व्यक्त करीत असतानाच आता ‘सुपर कॉप’ अशी ओळख असलेले ज्युलिओ रिबेरो यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. अस्थाना यांची नियुक्ती हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पोलीस यंत्रणेतील नियम अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे, अशा स्पष्ट शब्दांत रिबेरो यांनी सुनावले.

राकेश अस्थाना सीबीआयचे विशेष महासंचालक होते तेव्हा तत्कालीन संचालक आलोक वर्मा यांच्याशी झालेला वाद देशभर गाजला होता. दोघांनी एकमेकांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले होते. त्यानंतर अस्थाना यांची सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणून नियुक्ती केली. 31 जुलै रोजी ते निवृत्त होणार होते. मात्र, केंद्र सरकारने निवृत्तीच्या तीन दिवस आधीच अस्थाना यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली आणि दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली. विशेष म्हणजे यासाठी नियम बाजूला सारण्यात आले. अस्थाना हे गुजरात काडरचे आयपीएस अधिकारी आहेत. दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश आहे. त्यांचे काडर केंद्रशासित केले गेले. यासर्व घडामोडींवर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त, पंजाबचे माजी पोलीस महासंचालक ज्युलिओ रिबेरो यांनी एका संकेतस्थळासाठी लिहलेल्या लेखात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना परखड शब्दात सुनावले.

 काय म्हणाले रिबेरो?

पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांचा देशात कित्येक वर्षांपासून चालत आलेल्या पोलीस यंत्रणेतील नियमांना अस्थिर करण्याचा मानस आहे हे अस्थाना यांच्या नियुक्तीवरून उघड झाले आहे.

राज्य पोलीस कsडर हे स्वतंत्र असायचे, त्याचे पालन केले जायचे. मात्र, मोदीशहा यांच्या नेतृत्वाखालील प्रशासन हे सध्या देशातील प्रस्थापित व्यवस्था उधळून लावून त्या जागी त्यांना आवडणारी व्यवस्था प्रस्थापित करू पाहत आहेत.

31 जुलैला अस्थाना निवृत्त होणार होते. 27 जुलैला त्यांची दिल्ली पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली. एखाद्या वापरलेल्या रुमालाप्रमाणे नियम फेकून देण्यात आले.

अस्थाना यांच्या नियुक्तीला न्यायालयात आव्हान दिले तरी निकाल एक पिंवा दोन वर्षांनी लागेल. तोपर्यंत अस्थाना निवृत्त होतील. जे काही नुकसान करण्याचे नियोजन असेल ते झालेले असेल.

 

आपली प्रतिक्रिया द्या