बदनापूर तालुक्यात रानगाई व हरीणीचा कोवळ्या पिकांवर डल्ला; शेतकरी झाला हताश

123

सामना प्रतिनिधी । बदनापूर

शेतकऱ्यांमागील शुक्लकाष्ठ संपण्याचे नाव घेत नसून दुष्काळी परिस्थितीवर कशीबशी मात काढत यंदा झालेल्या अल्पशा पावसानंतर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या कोवळया पिकांवर रानगाई व हरीण डल्ला मारत असल्यामुळे पिकांची प्रचंड नासाडी होत असून शेतकरी हवालदिल झाले असून वन विभागाकडून या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याचे शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे.

बदनापूर तालुका मागील चार वर्षांपासून दुष्काळाचा मुकाबला करत आहे. यंदाही अतिशय उशीरा पावसाला सुरूवात झाली. अल्पशा पावसानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत. पण तालुक्यातील रोषणगाव, नानेगाव, बाजार वाहेगाव, मांजरगाव, सायगाव, डोंगरगाव आदी गावातील शेतकऱ्यांनीही पेरण्या केलेल्या आहेत पण या ठिकाणी मोठया संख्येने हरीण व रान गायींचा कळपच तयार झालेले दिसून येत आहे. रानगाईंचे तर ६० ते १०० संख्येने कळप आहे हा कळपच्या कळप शेतात घुसून शेतातील कोवळया पिकांची नासधूस करतो.
गाईप्रमाणेच हरीण व काळविटांचेही कळप असून ते ही अलगत कोवळया पिकांची कोंब व शेंडे खात असल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.

तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या यातना सहन करत असताना अत्यल्प पावसानंतर पिके जगविण्यासाठी धडपड शेतकरी करत असाताना दुसरीकडे हरणांचे व रानगाईंचे कळप धुमाकूळ घालत पिकांची नासधुस करत आहे. गेल्या आठ दिवसांपासून सात ते आठ हरणांचा मोठे कळप व ६० ते १०० गाईंचे दोन तीन कळप या परिसरातील शेतशिवारातील पिकांची नासाडी करत असल्याची माहिती नानेगाव येथील शेतकरी अरूण काळे यांनी दिली. बदनापूर तालुक्यातील रोषणगाव, नानेगाव, बाजार वाहेगाव, मांजरगाव, सायगाव, डोंगरगाव या भागात मोठ्या प्रमाणात हरणांचे व या रानगाईंचे वास्तव्य आहे. यातीलच अनेक कळप पाण्याच्या व अन्नाच्या शोधात भटकंती करत आहे. शेतातील उगवून आलेले तूर, मूग, सोयाबीन, मका, कापूस, बाजरी हे पिके जनावरांच्या खाण्यायोग्य वाढल्यामुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे आपली पिके वाचवण्यासाठी काही शेतकरी शेताची राखण करत आहे. अशावेळी शेतात व्यक्तीला बघितल्यानंतर हरणांचा कळप धूम ठोकत शेतातील उभ्या पिकातून पळत सुटल्याने उभी पिके भुईसपाट होऊन नुकसान होत असल्याने शेतकरी धास्तावले आहे.

दोन ते तीन दिवसांपासून शेतकरी या हरणांच्या कळपाला हुसकवण्याचा प्रयत्न करत असून, हरणांचे कळप दिवसाऐवजी रात्रीच्या वेळी शेतात धुडगूस घालत आहे. हरीण जरी एखाद दुसNया व्यक्तीला घाबरत असले तरी रानगाईंचा मोठा झुंडच असल्यामुळे त्यांना हुसकावणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. रानगाईचा कळपामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे आता वनविभागानेच या प्राण्यांचा अन्नाचा व पाण्याचा बंदोबस्त करावा, जेणे करून हे प्राणी
पिकांची नासाडी करणार नाही, अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या