कनिष्ठ डॉक्टरांचा बेमुदत संपाचा इशारा; सेवानिवृत्ती वय वाढवण्याचे परिपत्रक रद्द करण्याची मागणी

सरकारी, निम सरकारी, शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांचा जुन्या पेन्शन योजनेवरून संप सुरू असतानाच आता पालिका रुग्णालयातील शेकडो कनिष्ठ डॉक्टरांनी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील प्राध्यापकांच्या सेवानिवृत्तीचे वय 64 करण्याचे परिपत्रक रद्द करा, अशी या डॉक्टरांची मागणी आहे.

  महापालिका रुग्णालयातील काही ज्येष्ठ डॉक्टरांची मर्जी राखण्यासाठी प्राध्यापकांच्या सेवावृत्तीचे वय 64 वर्षे केल्याने महापालिकेच्या शेकडो कनिष्ठ डॉक्टरांमध्ये संतापाचे वातावरण आहे. हा अन्याय असून जारी केलेले परिपत्रक मागे घेण्यात यावे, यासाठी 4 मार्चला पालिका मुख्यालयातील आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यावर आयुक्तांनी 7 दिवसांत चर्चा करून परिपत्रक मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र 15 दिवस उलटले तरी हे परिपत्रक मागे घेण्यात आलेले नाही. त्यामुळे आता आमची सहनशीलता संपली असून डॉक्टरांच्या शिक्षक संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

…तर मंगळवारपासून आंदोलन

आयुक्तांनी परिपत्रक रद्द केले नाही तर मंगळवार 21 मार्चपासून आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरीही निर्णय न घेतल्यास सर्व रुग्णालयांत चक्का जाम, त्यानंतर बेमुदत उपोषण आणि शेवटचा पर्याय म्हणून सामूहिक राजीनामा देण्यात येणार आहे, असा इशारा कनिष्ठ डॉक्टरांच्या शिक्षक संघटनेचे सचिव डॉ. रवींद्र देवकर यांनी दिला आहे.

पालिका प्रशासनाचा सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा फटका महापालिकेतील सुमारे  एक हजारपेक्षा जास्त डॉक्टर शिक्षकांना बसणार आहे. यातील अनेक शिक्षकांनी पदोन्नतीसाठी आवश्यक असलेले पात्रतेचे निकष पूर्ण केलेले आहेत. यामुळे सहाय्यक पदावर कार्यरत असलेले अनेक मेहनती, उत्साही आणि सर्वोत्तम सेवा देण्यास इच्छुक असलेले शिक्षक हे पदोन्नत्तीपासून वंचित राहणार आहेत.

निवृत्तीचे वय तीनदा वाढवले

प्राध्यापक डॉक्टरांचे सेवानिवृत्तीचे वय 64 केल्याचे परिपत्रक पालिका प्रशासनाने 28 फेब्रुवारीला जारी केले. त्याआधी डॉक्टरांचे सेवानिवृत्तीचे वय 58वरून 60 आणि नंतर 62 करण्यात आले.