जंक फूड… नकोच

233

>>अनुजा पटेल, आहारतज्ञ<<

शाळांमधून जंक फूड आता बंद झाले आहे. पण एरवी महाविद्यालयात, पार्टीत हा मोह आवरता येत नाहीकशी बदलावी ही सवय

शालेय उपाहारगृहांमध्ये जंक फूड बंद करण्याचा हिंदुस्थान सरकारचा निर्णय अतिशय स्वागतार्ह असाच आहे. या निर्णयामुळे मुलांमधील लठ्ठपणाला आळा बसण्यास काही अंशी नक्की मदत होईल हे नक्की.

जंक फूड म्हणजे नेमकं काय? ज्या अन्नपदार्थांत कॅलरीज अतिशय जास्त व इतर न्यूट्रियंट्स अतिशय कमी असतात किंवा नाहीतच अशा अन्नपदार्थांना जंक फूड म्हणतात. उदा. पिझ्झा, बर्गर, जेली, जाम, कोल्ड ड्रिंक्स, चायनीज फूड, रस्त्यावरील तळलेले खाद्यपदार्थ, गोड पदार्थ, चिप्स, नूडल्स वगैरे… कुठल्याही वयोगटात हे पदार्थ हानीकारकच ठरतात. लहान मुलांमध्ये प्रामुख्याने लठ्ठपणा, सुस्ती, हार्मोन्सचा असमतोल, आक्रमकता, एकाग्रता नाहीशी होणे असे व इतर अनेक दुष्परिणाम दिसून येतात. त्यामुळे त्या अन्नपदार्थांचे सेवन टाळलेलंच बरं, परंतु वास्तविक पाहता शालेय उपाहारगृहांव्यतिरिक्तही अनेक पर्याय उपलब्ध आहेत, जिथे मुलं जंक फूड खात असतात. ही मुलं ७० ते ८० टक्के जंक फूड आपल्या पालकांबरोबरच खातात असं दिसून आलंय. त्यामुळे सरकारप्रमाणेच पालकांचंही प्रथम कर्तव्य आहे की, त्यांनी घरामध्येच जंक फूड बंद करावं. बाहेरचे तयार पदार्थ आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेले ताजे अन्न कधीही उपकारक ठरते. खरं पाहिलं तर सर्वच शाळांमध्ये उपाहारगृहांची सोय नसते. त्यामुळे पालक त्यांना डब्यात काय देतात हे खूप महत्त्वाचं ठरतं.

एका संशोधनातून असं प्रत्ययास आलं आहे की, कुठल्याही गोष्टीला जर कडाडून विरोध केला तर मुलांमध्ये नेमक्या त्याच गोष्टी करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. जंक फूडचे हे हानीकारक गुणधर्म मुलांना माहीत नसतात, पण पालकांनी विरोध केला तर हेच जंक फूड बाहेर जाऊन खाण्याची त्यांची इच्छा वाढीस लागते. मग पालकांच्या नकळत लपूनछपून जंक फूड खायचे प्रमाण वाढू शकते. मग अशावेळी एक पालक म्हणून आपली भूमिका नेमकी कशी असली पाहिजे? कधी कधी धकाधकीच्या जीवनात वेळेअभावी काही पालकांना डब्यामध्ये इन्स्टंट फूडचा वापर करावा लागतो. या सर्व बाबींचा विचार करून कोणते जंक फूड निवडावे हे ठरवता येईल.

>सर्वप्रथम पालकांनी आपल्या पाल्याचा आदर्श बनण्याची गरज आहे. आधी त्यांनी स्वतः घरचेच आरोग्यदायी खाद्यपदार्थ खाण्याची सवय लावून घेतली पाहिजे. घरचे रेशन पालकच भरतात, मुलं नाही.

>सकाळचे कॉलेज असेल तर मुलांना सक्तीने घरूनच काहीतरी पोळी, फोडणीचा भात, ओट्स, दूधपोहे वगैरे खाऊन शाळेत पाठवायचे.

>मुलांसाठी टिफिन बनवणे जर पालकांना शक्य नसेल तर किमान त्यांनी मुलांबरोबर फळे व सुकामेवा तरी पाठवावा. फळे व ड्रायफ्रूट्स खाल्ल्यामुळे मुलांची अर्धी भूक भागेल आणि बाहेरचे पदार्थ कमी प्रमाणात खाल्ले जातील.

>बाहेर फिरायला किंवा हॉटेलमध्ये गेलात तर शक्यतो चीज, सॉस, मैदा, अतिरिक्त साखर, तळलेले पदार्थ खाणे टाळा. त्याऐवजी जेवण सुरू करण्यापूर्वी सॅलेड, व्हेज. रायतं यांसारख्या डिशेस ऑर्डर करू शकता.

>तरुणांनी लक्षात ठेवायचे की, स्टार्टर्स ऑर्डर करताना शक्यतो रोस्टेड, बेक्ड, तंदुरी किंवा ग्रिल्ड पदार्थ निवडावेत.

>कधीकाळी अगदीच बाहेरचे गाडीवरील पदार्थ खायची वेळ आलीच तरी तळकट पदार्थ टाळावेत. कारण असे पदार्थ बहुतांशी जास्तवेळा तळून झालेल्या तेलातच तळलेले असतात.

>लग्नकार्यामध्ये जेवतानाही तरुणांनी आधी सॅलेड खायची सवय लावायला हवी. आधीच ते खाल्लेले असले की मग लग्नातले तळलेले पदार्थ जास्त खाता येत नाहीत.

>वाढदिवसाची पार्टी हीसुद्धा आजच्या तरुणपिढीसाठी नेहमीचीच झालीय. वाढदिवस असला म्हणजे केक, समोसा, वेफर्स… हे समीकरणच झालंय. पण आता ते बदलायला हवे. त्याऐवजी लहान इडल्या, ढोकळा, ऍपी, छोटा उत्तप्पा व वेफर्सऐवजी पॉपकॉर्न्स किंवा शंकरपाळे तरुण मुलांनाही आवडतात.

>सर्वात उत्तम उपाय म्हणजे वाढदिवस पार्टी किंवा लग्नाला जायच्या आधी तरुण-तरुणींनी घरूनच व्यवस्थित खाऊन निघायचे.

आपली प्रतिक्रिया द्या