आभाळमाया वैश्विक – वादळी प्रकृतीचा गुरू

80

[email protected]

आकाराने आपल्या पृथ्वीच्या ११ पट असलेल्या गुरू ग्रहावरचं वातावरण वायुरूप असल्याचं ठाऊक आहेच. या ग्रहाचं ‘गुरु’त्व त्याच्या या विशाल असण्यावरच ठरतं. सूर्यमालेतील सूर्याबाहेरच्या एकूण वस्तुमानापैकी एकटय़ा गुरूमध्ये ७० टक्के वस्तुमान साठवलेलं आहे एवढा त्याचा विस्तार. आपल्या पूर्वजांनी नुसत्या डोळय़ांनी केलेल्या निरीक्षणावरून या ग्रहाला ‘गुरू’ म्हणजे मोठा असं म्हटलं हे विशेष आहे.

सन १६०० पासून गुरूचं निरीक्षण आधुनिक उपकरणांद्वारे सुरू झाले. गॅलिलिओने त्याचे चार चंद्र पाहिले. हायड्रोजन आणि हेलियम वायूंचा अफाट साठा असलेल्या या ग्रहाचं जवळून दर्शन  व फोटो घेतले ते १९७९ मध्ये व्हायेजर-१ या अवकाशयानाने. सूर्याभोवती एक परिक्रमा करायला गुरूला १२ वर्षे लागतात. त्यामुळे एका राशीच्या पार्श्वभूमीवर तो सुमारे १ वर्ष दिसतो. सध्या हा ग्रह कन्या राशीत रात्रीच्या आकाशात ठळकपणे दिसतो. यानंतरच्या काळात केवळ त्याचेच तेजस्वी दर्शन नव्हे तर एकूणच ‘तारांगण’ आपल्या देशातील पावसाळी वातावरणामुळे दुर्लभ होईल.

पृथ्वीच्या वस्तुमानाच्या ३१८ पट वस्तुमान असलेल्या गुरू ग्रहाच्या मध्यभागी सीझन बॉलवरच्या शिवणीसारखा ‘बॅण्ड’ दिसतो तर त्याच्या दक्षिण गोलार्धात पृथ्वीच्या आकाराचे महाकाय वादळ घोंघावताना दिसते. त्याची गती घडय़ाळय़ाच्या काटय़ांच्या तुलनेत उलट (ऍण्टी क्लॉक) आहे. या विराट वादळाला ‘ग्रेट रेड स्पॉट’ असं म्हणतात. गुरूच्या लाल ‘डोळय़ा’सारखं ते दुर्बिणीतून दिसतं.

पृथ्वीवरून अवकाशयानं सोडायला सुरुवात झाल्यापासून १९७० मध्ये अवकाश संशोधकांनी ‘गुरू’कडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली. १९७३च्या डिसेंबर महिन्यात पायोनियर-१० हे यान गुरूपासून १,३१,००० किलोमीटरवरून पसार झालं तर १९७४ मध्ये पायोनियर-११ या यानाने केवळ ४६,४०० किलोमीटरवरून सर्व ग्रहांच्या या ‘दादा’चं दर्शन घेतलं.

या सर्व निरीक्षणांमध्ये गुरूवरच्या ‘ग्रेट रेड स्पॉट’ या वादळाचा आकार ४० हजार बाय १४ हजार किलोमीटर असल्याचं लक्षात आलं आणि त्यात एकूण तीन ‘पृथ्वी’ बसतील असं वाटलं. मात्र १९७९ मध्ये त्याचं खरं रूप समजून ते पृथ्वीपेक्षा थोडंसंच मोठं असल्याचं समजलं. विज्ञानामध्ये पूर्वीची भाकितं अथवा सिद्धांत नव्या संशोधनाने बदलले तर ते स्वीकारण्याची ताकद असते. पूर्वी गुरूच्या दक्षिण गोलार्धातील हे वादळ गुरूच्या उत्तर गोलार्धाकडे सरकल्याचे नंतर लक्षात आले. हे वादळ स्वतःच्या केंद्रकाभोवती सुमारे सहा दिवसांत फिरते. त्याच्या उत्तर व दक्षिण ध्रुवावरचे वारे विरुद्ध दिशेने वाहतात.

गुरूवरच्या या वादळाविषयी आता एवढं सांगण्याचं कारण म्हणजे ‘जुनो’ नावाची महत्त्वाकांक्षी शोधमोहीम गुरूचा नव्याने शोध घेत आहे. या महाग्रहाच्या ध्रुवीय प्रदेशातही प्रचंड वादळे घुमत असल्याचं ‘जुनो’च्या लक्षात आलं आहे. एवढंच नव्हे तर चांगली बारा-पंधरा वादळं गुरूवर सतत थैमान घालत असतात. एकूण गुरू ‘झंझावाती’ ग्रह दिसतो!

गुरूच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर रोरावणाऱया वादळांचा आकारही काही कमी नाही. त्यांची लांबी सुमारे २८०० किलोमीटर एवढी आहे. थोडक्यात आपल्या ‘गुरू’ची प्रकृती वादळी आणि उग्र दिसते. या महाकाय ग्रहानेच ‘स्विफ्ट टटल-९’ नावाचा धूमकेतू स्वतःकडे खेचून घेतला होता. गुरू आणि शनी या ग्रहांच्या विशाल अवकाशस्थ

‘ढालीं’मुळे पृथ्वीचं अनेक अशनी (महापाषाण) आणि धूमकेतूंपासून रक्षण झालं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. गुरूवरच्या वादळात असे अनेक धूमकेतू ‘पंचवण्याची’ शक्ती आहे. त्याचं ‘मोठे’पण आपल्यासाठी उपकारकच आहे!

आपली प्रतिक्रिया द्या