पतीसोबत देवदर्शनाला आलेली नववधू प्रियकरासोबत पळाली

सामना प्रतिनिधी । पाथर्डी

अवघ्या तीन दिवसांपूर्वी लग्न झालेले नवदाम्पत्य  तालुक्यातील मढी येथे देवदर्शनासाठी आले. मात्र दर्शन घेऊन परत जात असतानाच नवरी मुलगी आपल्या प्रियकरा सोबत पळून गेली. बुधवारी तालुक्यातील  मढी येथे ही घटना घडली. हे पलायन नाट्य मात्र देवस्थानच्या सी सी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. दरम्यान  पतीने आपली पत्नीची मढी येथून बेपत्ता झाल्याची खबर पाथर्डी पोलीस स्टेशनला दिली आहे.

या बाबत  अधिक  माहिती अशी कि शेवगाव तालुक्यातील एका युवकाचा तीन दिवसांपूर्वी विवाह झाला होता. नवदाम्पत्य देवदर्शनासाठी मढी येथील कानिफनाथांच्या समाधीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून आले होते. देवस्थान समितीच्या पार्किंगमध्ये आपली दुचाकी लावून दोघेही नाथांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेले.   दर्शन घेतल्या नंतर दोघे मंदिराच्या बाहेर पडले. या जोडप्याच्या मागोमाग विवाहितेचा प्रियकरही होता. देवस्थानच्या वाहनतळावर लावलेली आपली दुचाकी घेण्यासाठी नवरदेव गेला असता त्या  संधी चा फायदा उठवत नवविवाहितेने प्रियकराच्या दुचाकी वर बसून या धूम ठोकली. त्या नंतर पार्किंग मधे लावलेली दुचाकी घेऊन नवरदेव आला असता शोधाशोध करूनही त्याला आपली पत्नी न दिसल्याने त्याने आजूबाजूच्या दुकानदाराकडे चौकशी केली मात्र कोणालाही काहीच सांगता न आल्याने तो देवस्थान सामितीच्या कार्यालयात आला. आपण पत्नीसह आलो होतो मात्र ती सापडत नाही अशी तक्रार केली असता देवस्थान मधील कर्मचार्‍यांनी सी सी टीव्ही फुटेज तपासले असता खरा प्रकार उघडकीस आला.

या चित्रीकरणात पाठीवर सॅक घेतलेला प्रियकर या जोडप्याच्या  मागोमाग चालत असून प्रियकर व नवरी मुलगी एकमेकांना खुणा करत असल्याचेही स्पष्ट  दिसत आहे तर त्या नंतर दोघेही एका दुचाकी वरून जाताना दिसत आहे. या घटनेची माहिती आपल्या नातेवाईकांना फोन वरून देऊन नवरा मुलगा हताश होऊन घरी परतला.