‘जस्ट प्ले’ मेळाव्याचे उद्घाटन : मुंबईकर फुटबॉलपटू राष्ट्रीय संघात दिसावेत – आदित्य ठाकरे

34

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईने देशाला नामवंत क्रिकेटपटू दिले आहेत. आता हिंदुस्थानी संघाने गुणांकनात पहिल्या १०० संघांत मजल मारली आहे. याचा आनंद आहे. पण मुंबईचे फुटबॉलपटू राष्ट्रीय संघांत मोठ्या संख्येने दिसायला हवेत. तो दिन मुंबई डिस्ट्रीवट फुटबॉल असोसिएशनसाठी (एमडीएफए) ‘सुवर्णदिन’ ठरेल, असे भावनिक मनोगत युवासेना प्रमुख व एमडीएफएचे चेअरमन आदित्य ठाकरे यांनी कूपरेज मैदानावरील ‘जस्ट प्ले’ सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना व्यक्त केले.

वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेने (विफा) मुंबईतील १००० शाळकरी विद्यार्थ्यांना व क्रीडा शिक्षकांना फुटबॉलचे हायटेक प्रशिक्षण देण्याचा उपक्रम आखला आहे. ‘जस्ट टू प्ले’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला मुंबई महानगरपालिका, ऑस्ट्रेलियन फुटबॉल महासंघ, एमडीएफए, युईएफए यांनी उत्स्फूर्त सहकार्य दिले आहे.

मुंबईत फुटबॉलच्या प्रसार आणि प्रचारासाठी एमडीएफएने राबवलेल्या उपक्रमांना चांगले यश लाभले आहे. अंधेरीच्या शहाजी राजे क्रीडा संकुलातील मैदानाला आंतरराष्ट्रीय फुटबॉल मैदानाचा दर्जा मिळणे आणि मुंबईकर युवकांत फुटबॉलची ‘क्रेझ’ निर्माण होणे हे या प्रयत्नांना लाभलेले यश असल्याचे सांगून, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईकरांत फुटबॉलची आवड वाढवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांना एमडीएफए नेहमीच सर्वतोपरी मदत करील. पालिकेच्या माध्यमातून मुंबईत उत्तम क्रीडांगणे तयार करण्याची आमची योजना आहे. ‘विफा’च्या ‘जस्ट प्ले’ सोहळ्याच्या शुभारंभाला अखिल हिंदुस्थानी फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे (विफा) अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, आशिया फुटबॉल महासंघाच्या संचालिका मोया डोड, मुंबईच्या उपमहापौर हेमांगी वरळीकर, युईएफए फाऊंडेशनचे मुख्य प्रशासक सिरिल पेल्लेव्हॅट व ऑस्ट्रेलियन फुटबॉल महासंघाचे पदाधिकारीही उपस्थित होते.

प्रफुल्ल पटेल यांनी केले एमडीएफएच्या कामाचे कौतुक
मुंबईत तळागाळातील युवकांनाही फुटबॉलची गोडी वाढवण्याचे मुंबई डिस्ट्रीक्ट फुटबॉल संघटनेचे कार्य गौरवास्पदच आहे. चेअरमन आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंधेरीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम उभे राहिलेय. ही कौतुकास्पद गोष्ट आहे, असे सांगून एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईत युवकांसाठी फुटबॉलची दर्जेदार मैदाने उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना केले.

१ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणार
विफा आपल्या ‘जस्ट प्ले’ उपक्रमात मुंबईतील विविध शाळांतील ६ ते १२ वर्षे वयोगटातील सुमारे १००० विद्यार्थी, १७ क्रीडा प्रशिक्षक व २५ पीटी शिक्षकांना फुटबॉलचे हायटेक प्रशिक्षण देणार आहे. विशेष म्हणजे महापालिका शाळांतील शेकडो विद्यार्थी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतील, अशी माहिती ‘विफा’चे सीईओ हेन्री मेनेझिस यांनी दिली.

महोत्सवाला मान्यवरांची उपस्थिती
कुलाब्याच्या कुपरेज स्टेडियमवर पार पडलेल्या ‘विफा’च्या ‘जस्ट प्ले’ महोत्सवाला ‘एमडीएफए’चे अध्यक्ष दिगंबर कांडरकर, सचिव उदयन बॅनर्जी, मुंबई महानगरपालिका सभागृह नेते यशवंत जाधव, श्रीमंत छत्रपती मालोजीराजे भोसले, ‘विफा’चे सचिव साऊटर वाझ, कृष्णा पवळे हे मान्यवरही उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या