सृजन संवाद – रामराज्यातील न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध

>>डॉ. समिरा गुजर जोशी

एक निष्पक्ष न्यायव्यवस्था हा कोणत्याही समाजाचा कणा असतो. आपल्या हिंदुस्थानी परंपरेत न्यायदानाचा सखोल विचार झालेला दिसतो. एक प्रकारे हा विचार धर्मशास्त्राच्या अंतर्गत केला गेला असला तरी संपूर्ण न्यायव्यवस्थेच्या शिखर स्थानी राजा होता. म्हणजे आजच्या काळात ‘सुप्रीम कोर्ट’ म्हणू या.

ही जबाबदारी राजावर असल्यामुळे राजधर्मामध्येसुद्धा न्यायदान कसे असावे, याची चर्चा अनेक ग्रंथांमधून केलेली आढळते. रामायणात हा अयोध्याकांडातील श्रीराम आणि भरत यांच्यामध्ये झालेला हा जो दीर्घ संवाद आपण चर्चेस घेतला आहे, त्यामध्येदेखील श्रीरामांनी हिंदुस्थानला न्यायव्यवस्थाविषयक काही प्रश्न विचारले आहेत. श्रीराम विचारतात, “भरता, एखाद्या सभ्य गृहस्थावर दुष्कृत्य केल्याचा आरोप झाल्यावर योग्य शहानिशा न होता त्याला दंड झाला असे तर होत नाही ना ! एरवी सत्शील असणाऱया व्यक्तीने अपराध का केला, याची कसून चौकशी करून मगच योग्य ते शासन त्याला देण्यात यावे. त्याच्या उलट, एखाद्याला मुद्देमालासकट पकडले आहे, त्याने आपण गुन्हा केला असल्याची कबुलीही दिली आहे, पण त्याच्याकडून लाच घेऊन त्याला सोडून देण्यात आले असे तर तुझ्या राज्यात होत नाही ना !’’

हे वाचत असताना श्रीमंत पालकांच्या मुलांच्या हातून गुन्हा घडला असता साक्षीपुरावे त्यांच्याविरुद्ध असतानाही लाच देण्याची क्षमता असल्यामुळे अतिशय गंभीर गुह्यातूनही सुटका होऊ शकते याची काही अलीकडे घडलेली उदाहरणेसुद्धा सहज आठवतील. श्रीरामांनी येथे स्पष्ट प्रश्न विचारला आहे की, गरीब आणि श्रीमंत या दोघांमध्ये परस्पर काही वाद उपस्थित झाला तर तुझे अमात्य निपक्षपातीपणाने त्या वादाचा निकाल लावतात ना? त्यांचे झुकते माप श्रीमंतांना मिळते असे तर होत नाही ना? त्यानंतर श्रीरामांनी भरताच्या निमित्ताने सर्व सत्ताधारकांना एक इशारा दिला आहे की, ज्यांच्यावर निष्कारण आरोप झाला आहे अशा निरपराध प्रजेचे अश्रू केवळ राजा होण्याने प्राप्त होणाऱया सुखावर डोळा ठेवणाऱया राजाच्या पुत्रांचा आणि पशूंचा नाश करतात.

अनेकदा तौलनिकदृष्टय़ा असे म्हटले जाते की, रामायण आणि महाभारत या दोन महाकाव्यांमध्ये महाभारत हे सामाजिक वास्तवाचे दाहक दर्शन घडविते. त्यामानाने रामायण अधिक आदर्शवादी आहे, पण रामायणातील अशी चर्चास्थळे पाहिल्यानंतर लक्षात येते की, रामायणाने जरी आदर्श सांगितले असले तरी समाज व्यवस्थेतील उणिवांचे वा आव्हानांचे भान रामायणातही आहे. न्यायव्यवस्थेतील उणिवांवर इथे किती नेमकेपणाने बोट ठेवले आहे. श्रीमंत आपल्या पैशांच्या जोरावर न्याय विकत घेऊ शकतात हे सत्य किती सनातन आहे याचाही प्रत्यय यानिमित्ताने येतो.

राजदूत (Ambassador/Diplomat) हादेखील राजासाठी अतिशय महत्त्वाची बाब. श्रीरामांच्या प्रश्नातून राजदूताविषयीच्या त्यांच्या अपेक्षाही व्यक्त होतात. ते विचारतात, “भरता! आपल्याच देशाचा नागरिक असणारा कोणी विद्वान जो सरळमार्गी, समयसूचक आणि सांगितलेला निरोप जसाच्या तसा सांगणारा आणि चतुर असा आहे त्यालाच दूत म्हणून तू नेमला आहेस ना?’’ आपले परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काही दिवसांपूर्वी असे म्हटले होते की, हनुमान आणि श्रीकृष्ण हे हिंदुस्थानात होऊन गेलेले आदर्श Diplomat होते. त्या दोघांनी दूत म्हणून बजावलेल्या कामगिरीकडे यादृष्टीने बारकाईने पाहायला हवे.

राजदूताइतकीच आणखी एक महत्त्वाची यंत्रणा म्हणजे राजाचे हेर होत. राजाचे हेर म्हणजे राजाचे डोळे असतात असे मानले जाते. ‘कौटिलीय अर्थशास्त्रा’सारखा ग्रंथ हेरांचे प्रकार किती, ते कशा प्रकारे काम करतात या सगळ्याविषयी अतिशय बारकाव्यानिशी सांगतो. आजच्या हेरांनाही ते विवेचन लागू पडते, पण याबद्दल श्रीरामांनी केलेले मार्गदर्शनही थक्क करणारे आहे. राजाने आपल्या शत्रुराज्यातील कोणाकोणावर लक्ष ठेवायला हवे याची त्यांनी एक यादीच दिली आहे. त्यामध्ये शत्रुराष्ट्राचे मंत्री, पुरोहित, युवराज, सेनापती, द्वारपाल, अंतपुराध्यक्ष, तुरुंगाचा अधिकारी, खजिनदार, राजाची आज्ञापत्रे लिहिणारा, न्यायाधीश, सैन्याला पगार वाटणारा, नगररक्षक, सीमारक्षक अशा अनेकांचा सहभाग आहे. या सर्वांमागे प्रत्येकी तीन – तीन हेर नेमले जावेत असे श्रीराम सांगतात. एवढेच नव्हे तर त्या हेरांना परस्परांची माहिती असू नये याची खबरदारी घेण्यासही सांगतात. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचे तर फॉरेन लँडमध्ये आपले किती असेट्स असायला हवेत हे त्यांनी सांगितले आहे. आलिया भट अभिनित ‘राजी’सारख्या सिनेमाची आठवण इथे सहजपणे होते.

एवढेच सांगून श्रीराम थांबत नाहीत, तर आपले मंत्री, पुरोहित, युवराज वगळता स्वतच्या इतर अधिकारी वर्गासाठीसुद्धा (ज्यांची नेमणूक राजानेच स्वत केली आहे) गुप्तचर नेमावेत असे सांगितले आहे. राजाने सदैव सतर्क असायला हवे. त्याने कोणत्याही बाबतीत गाफील राहून चालणार नाही, असे सांगत असताना श्रीराम विचारतात, “राज्याला अपायकारक वर्तन करणाऱया ज्या लोकांना तू देशाबाहेर घालवले असशील ते कालांतराने परतल्यावर त्यांना दुबळे समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नकोस. कारण ते तुझ्याद्वारे दुखावले गेलेले लोक आहेत. त्यांना शत्रूने आपल्या बाजूला वळवून तुझ्याकडे हेर म्हणून पाठवले असण्याची शक्यता असते.’’ कितीतरी वेब सीरिज लिहिता येतील अशा प्रकारचे हे विवेचन आहे. राजकीय परिस्थितीचे सखोल भान आहेच, पण इतर राष्ट्रांविषयीच्या धोरणाची सखोल जाणही आहे. अशा प्रकारच्या चर्चेची रामायणात अन्य ठिकाणेही आहेत, पण या एकाच राम – भरत संवादाच्या ठिकाणी अनेक राजनैतिक प्रश्नांना सहज स्पर्श करण्याचे ऋषी वाल्मीकींचे कौशल्य थक्क करणारे आहे हे निश्चित!
[email protected]
(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाची अभ्यासक)