न्यायमूर्ती चेलमेश्वर निवृत्त!

32

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सरन्यायाधीशांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन अन्यायाला वाचा फोडणारे न्या. चेलमेश्वर शुक्रवारी निवृत्त झाले. सर्वोच्च न्यायालयातील परंपरेनुसार शेवटच्या दिवशी ते सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठात बसले. अगोदरच जाहीर केल्याप्रमाणे त्यांनी निरोपाचे हारतुरे स्वीकारले नाहीत.

१२ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन थेट सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. या चार न्यायमूर्तींमध्ये न्या. चेलमेश्वर एक होते. ते २२ जूनला निवृत्त होणार आहेत. परंतु न्यायालयाच्या उन्हाळी सुटय़ा सुरू होणार असल्याने ते आज प्रथम न्यायालय कक्षात सरन्यायाधीश दीपक मिश्रा व न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठात काही काळ बसले. हे विशेष पीठ अवघ्या तासाभरात उठले. या काळात फारसे कामकाज करण्यात आले नाही. ज्येष्ठ विधिज्ञ राजीव दत्ता, प्रशांत भूषण तसेच गोपाल शंकरनारायणन यांनी न्या. चेलमेश्वर यांच्या गौरवार्थ भाषणे केली.

आपली प्रतिक्रिया द्या