न्यायदेवतेवरील विश्वास सार्थ ठरला; उद्धव ठाकरे यांनी मानले न्यायालयाचे आभार

शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा होऊ नये, यासाठी खोडा घालणाऱ्या शिंदे गटाची याचिका न्यायालयाने फेटाळत, शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे. उच्च न्यायालयामध्ये होणाऱ्या सुनावणीकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले होते. यावर निकाल देताना न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत, या निकालाबाबत प्रतिक्रिया दिली.

न्यायदेवतेवर आपला विश्वास आहे, हे आपण नेहमी सांगत आहोत. आपला न्यायदेवतेवरील विश्वास सार्थ ठरला आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. हा लोकशाहीचा विजय आहे. दसरा मेळाव्यासाठी गुलाल उधळत उत्साहात या, पण शिस्तीत या असे आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना आणि जनतेला केले. आपल्या तेजस्वी पंरपरेला, वारशाला गालबोट लागेल असे काही करू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

न्यायालयाने कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकारवर सोपवली आहे. राज्य सरकार ही जबाबदारी पार पाडेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. शिवसेनेत दोन गट नाहीत, शिवसेना आता वाढली आहे. नुकत्याच झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात हे दिसून आले आहे, असे ते म्हणाले. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला तेजस्वी परंपरा आहे, कोरोना काळ सोडला तर दसरा मेळाव्यात कधीही खंड पडला नाही, असेही त्यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या निकालात देशातील लोकशाहीची दिशा ठरणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. आपला न्यायदेवतेवर विश्वास आहे. आज तो सार्थ ठरला आहे. आम्ही यापुढेही विजय मिळवत राहू, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

न्यायालय ,वकिलांचे मानले आभार

न्यायदेवतेवरील आपला विश्वास सार्थ ठरला, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी न्यायालय आणि वकिलांचे आभार मानले आहेत. न्यायालयात शिवसेनेच्या वतीने अस्पी चिनॉय यांनी बाजू मांडताना त्यांनी शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांच्या हस्तक्षेप याचिकेविरोधात जोरदार युक्तीवाद केला होता. त्यांचेही उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत.