भगवानदादांना न्याय मिळाला!

  • राजा दिलीप

एक अलबेला चित्रपटातील नायकाच्या भूमिकेसाठी मला मिळालेला राज्य शासनाकडचा पुरस्कार म्हणजे मास्टर भगवानदादांना न्याय मिळालाय अशीच माझी भावना व भूमिका असून मी केवळ फक्त माध्यम आहे, अशी भावना मंगेश देसाई याने व्यक्त केली. ‘एक अलबेला’ चित्रपटात भगवानदादांची भूमिका साकारणारा हरहुन्नरी मंगेश देसाई याला यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरकार मिळाला आहे. मंगेश जाम खूष आहे.

मंगेशने ‘एक अलबेला’मधील भगवानदादांच्या व्यक्तिरेखेसाठी घेतलेल्या मेहनतीची कल्पना होतीच. त्याची त्याला आठवण करून देताच तो म्हणाला, होय. ती व्यक्तिरेखा साकारणे म्हणजे मला एक प्रकारचे आव्हानच तर होते व बरीच मेहनत घ्यावी लागली. पण त्यात आनंदही होता. निर्माते मोनिश बाबरे व दिग्दर्शक शेखर सरतांडेल यानी माझी निवडच केली नसती तर पुढची कोणतीच गोष्ट घडली नसती. कारण मला फक्त होकार द्यायचा नव्हता, तर दादांच्या दिसण्यापासून मला तयारी करायची होती. मेकअपमन विद्याधर भट्टे यानी मग माझ्यावर आणि अर्थातच माझ्या चेहऱ्यावर खूप खूप मेहनत घेतलीय. पण एवढ्यावरून मी ही व्यक्तिरेखा कशी साकारणार? म्हणून मग मी भगवानदादांबाबत जेवढे म्हणून वाचता येईल तेवढे वाचत सुटलो. त्यांच्या मुलाला, मुलीला व इतर नातेवाईकांना भेटलो. त्यांच्या संबंधित अनेकांना भेटलो. त्यांच्याकडून दादांबाबत भरपूर प्रमाणात माहिती मिळवली. त्यातून मला लक्षात आले की, भगवानदादा एक दिलदार गृहस्थ होते. त्यांचे ते वैशिष्ट्य मला प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात यश मिळायला हवेय.

आजच्या पिढीतील रसिकांसमोर हे सगळेच यायला हवे असे मला वाटले. दुर्दैवाने नंतरच्या काळात ते कफल्लक देखील झाले होते.
मंगेश देसाई थोडासा भावुक होत सांगत होता. या चित्रपटासाठी म्हणून मंगेशने अलबेला (१९५१) हा चित्रपट किती वेळेस पाहिला असा प्रश्न अगदी स्वाभाविक ठरतो. यावर तो म्हणाला, दादांचे अलबेला इत्यादी चित्रपट मी पाहिलेच. कारण मला त्यांचा क्रीन प्रेझेंस जाणून घ्यायचा होता. अलबेलाची गाणी लोकप्रिय ठरली तरी दादाना तेव्हा भरपूर यश वगैरे असे नाहीच. काही वर्षांनी अलबेला रिपिट रनला प्रदर्शित झाला तेव्हा प्रचंड प्रमाणात लोकप्रिय झाला. पण तरी दादांचे अधिक कौतुक व्हायलाच हवे होते असेच वाटते. या पुरस्काराने एक प्रकारे ते झालेय असे मी म्हणेन. मंगेश देसाई म्हणाला.

मंगेश म्हणाला, ‘पुरस्कार भरपूर मानसिक आनंद देतात. तसेच एकदमच अनेक माणसे जोडली जातात. आजही मी हे अनुभवतोय. पण गेल्या वर्षभरात मात्र मी या भूमिकेसाठी कोठेच कसे साधे नामांकन मिळत नाही म्हणून थोडा थोडासा नर्व्हस होत चाललो होतो. तसा मी डिस्टर्ब अथवा फस्ट्रेट होणारा कलाकार नाही. मला मानसिक समतोल साधणे जमते. पण मी सखोल अभ्यास करून मेहनतीने साकारलेल्या या चित्रपटाची कोणत्याच पुरस्कारात अजिबातच दखल नाही म्हणून मी निराश होत चाललो होतो. पण राज्य शासनाकडून माझी दखल घेतली गेल्याने मला बरे वाटले.’

मी निमित्तमात्र आहे. हे सगळेच श्रेय मा. भगवानदादांचे आहे. त्यांचाच हा गौरव झालाय. बावीस वर्षांपासून मी अभिनय क्षेत्रात असून राज्य शासनाकडून मिळालेला हा माझा पहिलाच पुरस्कार आहे. याबाबत खरं तर भगवानदादांचेच आभार मला मानायला हवेत. – मंगेश देसाई