‘सायकल गर्ल’ ज्योती कुमारीची कहाणी मोठय़ा पडद्यावर, अभिनेता संजय मिश्रा वडिलांची भूमिका साकारणार

1071

लॉकडाऊनच्या काळात देशातील विविध भागांत अनेक मजूर अडकले होते. यातील अनेकांनी पायी गाकावडची वाट धरली होती. या मजूरांचे रस्त्यात खूप हाल झाले. बिहारमधील ज्योती कुमारी या मुलीने लॉकडाऊनच्या दिवसांत वडिलांना सायकलवर मागच्या सीटवर बसवून हरियाणातील गुडगावपासून बिहारपर्यंत 1200 किमीचा प्रवास केला होता. ज्योतीच्या या हिंमतीचे सर्वांनी कौतुक केले. ज्योतीची कहाणी आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. ’आत्मनिर्भर’ असे या सिनेमाचे नाव आहे.

‘आत्मनिर्भर’ सिनेमात ज्योती स्वत: छोटी भूमिका करणार आहे. तिच्या वडिलांची भूमिका अभिनेता संजय मिश्रा साकारणार आहेत. सिनेमाचे शूटींग येत्या 25 ऑगस्टपासून सुरू होण्याची शक्यता आहे. ज्योतीचे वडील रिक्षाचालक आहेत. एका अपघातात जखमी झाल्यानंतर त्यांचा रोजगार हिरावला गेला. लॉकडाऊनमध्ये त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली. दोघांनी मूळ गावी परत जायचं ठरवलं. मात्र लॉकडाऊनमुळे प्रवासाचं कोणतंच साधन नक्हतं. त्यानंतर ज्योतीने 500 रुपये देऊन एक जुनी सायकल विकत घेतली आणि त्यावर वडिलांना बसवून लांबचा पल्ला गाठला. सायकलवर बसलेल्या ज्योतीचा फोटो व्हायरल झाल्यावर जगभरात तिच्या धाडसाची दखल घेतली गेली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांकानेही ज्योतीचे कौतुक केलं होतं. सायकल फेडेरेशन ऑफ इंडियानेही तिला ट्रायलसाठी बोलावले होते.

आपली प्रतिक्रिया द्या