आद्य शंकराचार्य

>> ज्योत्स्ना गाडगीळ

jyotsna-gadgilएकेश्वरवाद असे नवविचार त्या काळात मांडणाऱ्या आद्यशंकराचार्यां विषयी थोडे सविस्तर

उद्या आद्यशंकराचार्यांची जयंती आहे. शंकराचार्यांनी हिंदुस्थानभर भ्रमण करून सातव्या शतकात हिंदू धर्माची पुनःस्थापना केली. यांना आपल्या धर्मातील सर्वोच्च आचार्य मानले जाते. अद्वैतवादाचा पुरस्कार त्यांनी सुरू केला. शंकराचार्यांनी वेद, उपनिषदे, भगवद्गीता या विषयांवर अनेक भाष्यग्रंथ लिहिले आहेत. जीवनाचे तत्त्वज्ञान त्यांच्या ग्रंथातून मांडले आहे.

आठवे शतक साऱ्या जगात खळबळीचे होते. हिंदुस्थानवर परकीय आक्रमणे सुरू झाली होती. बौद्ध व जैन धर्माचा निरीश्वरवाद, नास्तिकवाद समाजात रुजला होता. महम्मद पैगंबराचा इस्लाम धर्म हिंदुस्थानापर्यंत येऊन पोहोचला होता. ‘खरा धर्म कोणता’, ‘खरे वैदिक ज्ञान कोणते’ अशा वैचारिक गोंधळात हिंदूंची भ्रमिष्ट अवस्था झाली होती. बौद्ध भिख्खू, जैन मुनी, ख्रिस्तांचे पाद्री आपापल्या अनुयायांना जशी धर्माची शिकवण देत, काळजी घेत तशी काळजी वाहणारे हिंदू धर्मात कोणी नव्हते. मूळच्या सनातन वैदिक धर्मापासून लोक दूर जाऊ लागले होते. अशा दिशाहीन झालेल्या समाजाला आद्य शंकराचार्यांच्या स्वरूपात धर्म संस्थापक मिळाला.

इ.स. ७८८ मध्ये केरळ प्रांतात पूर्णा नदीच्या काठी, कालडी या गावात आचार्यांचा जन्म झाला. लहानपणी वडील गेल्याने त्यांची जोपासना त्यांच्या मातेने केली. तिचे नाव आर्यांबा! मातेवर त्यांचे अतोनात प्रेम होते. त्यांच्या घराण्यात अध्ययन व अध्यापन यांची एक उज्ज्वल परंपरा चालत आलेली होती.

अलौकिक बुद्धीच्या जोरावर शंकराचार्यांनी वयाच्या आठव्या वर्षी सर्व वेदांचे अध्ययन पूर्ण केले. संन्यास घेण्याबद्दल आईची परवानगी मिळवून ते घराबाहेर पडले. ते थेट तिच्या मृत्यूसमयी तिची भेट घेण्यास आले. विंध्याद्रीच्या आसपास त्यांची गोविंद पूज्यपादाचार्य यांच्याशी गाठ पडली. त्यांनी उपदेश करून शंकराचार्यांना संन्यासदीक्षा दिली. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी सर्व शास्त्र्ाात प्रावीण्य प्राप्त केले. नंतर ते काशीला गेले. तेथील पंडितांशी ‘द्वैत-अद्वैत’ विषयावर वाद करून आपल्या विद्वत्तेने प्रभावित केले. मंडणमिश्र नावाच्या प्रख्यात विद्वानाचाही धर्मशास्त्र्ााच्या चर्चेत पराभव करून त्याला शिष्य बनवले. त्यामुळे त्यांची महती, कीर्ती वाढली.

अलौकिक प्रतिभा, प्रकांड पांडित्य, चाणाक्षबुद्धी, विरागी वृत्ती व आत्यंतिक तळमळ या भांडवलदार त्यांनी एक धर्मयुद्ध पुकारले. त्यासाठी वाहिलेले संन्यासी घडवले. संपूर्ण देश तीनदा पालथा घातला. आणि धर्माची पुनर्रचना करण्यासाठी देशाच्या चार दिशांना चार मठ स्थापन केले. दक्षिणेत शृंगेरी, पूर्वेला जगन्नाथपुरी, उत्तरेत बद्रिनाथ व पश्चिमेस द्वारका. धर्माचे कार्य योग्य पद्धतीने सांभाळणारे शिष्य धर्मपीठावर शंकराचार्य म्हणून नियुक्त केले. धर्मकार्याची आखणी करून दिली व अद्वैत सिद्धांताची शिकवण दिली.

याबाबत माहिती देताना वसई येथील धनंजयशास्त्र वैद्य म्हणाले, सामाजिक, राजकीय, आर्थिक बाबतीत हिंदू धर्मगुरूंचा हस्तक्षेप नसतो असे चित्र भासवले जाते, मात्र मूळ परिस्थिती अशी आहे की त्याने कार्य, त्यांचे निर्णय आणि आवश्यक बाबतीत केलेली चर्चा दुर्दैवाने प्रसारमाध्यमे समोरासमोर आणत नाहीत. उदा. देशाचे विभाजन होताना शंकराचार्यांनी विरोध केला होता. गोहत्याबंदीचे पहिले पाऊल शंकराचार्यांनी उचलले होते. अयोध्या राममंदिर उभारणीतही शंकराचार्यांचा पुढाकार आहे, तर रामसेतूबाबत चाललेल्या वादात खुद्द शंकराचार्यांनी सर्वोच्च न्यायालयात केस लढून तो तोडण्यावर स्थगिती आणली आहे. अशी बरीचशी कामे धर्मपीठाकडून सुरू असतात. जी आद्य शंकराचार्यांच्या प्रेरणेने सुरू असतात. ती जाणून घेऊन लोकांनी त्या विचारांचा पुरस्कार केला तर हिंदू धर्माची व्यापकता त्यांच्या लक्षात येईल.

एकेश्वरवादावर भर

> उत्पत्ती, स्थिती, लय व ब्रह्माचा खेळ बिनतक्रार स्वीकारा व तणावमुक्त अवस्थेत जगा, पण त्यासाठी मन निर्मळ व निर्भय टेवा असे सांगून शंकराचार्यांनी एकेश्वरवादावर भर दिला.

> चराचरात सामावलेल्या परमेश्वराचा आदर करून त्यांनी वैदिक सनातन धर्म रुजवला.

> धर्माचा लढा त्यांनी गुद्दय़ांनी नाही, तर मुद्दय़ांनी जिंकला. सुंदर साहित्य, काव्याची निर्मिती केली.

> धर्माची शास्त्रोक्त बैठक मांडून वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी ते अज्ञातवासात गेले. हिमालयातील केदारनाथ येथे गेले ते परतलेच नाहीत.

> आद्यशंकराचार्यांनी आखून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार चारही धर्मपीठांची कामे सुरळीत सुरू आहेत.

> शंकराचार्यांची नियुक्तीदेखील आद्यशंकराचार्यांनी आखून दिलेल्या नियमावलीनुसार होते. त्याला अन्य तीन पीठांच्या शंकराचार्यांची मंजुरी आवश्यक असते. त्या पदावर बसण्यास योग्य उमेदवार नसेल तर ते पद रिक्त ठेवले जाते. परंतु अयोग्य व्यक्तीच्या हाती कार्यभार सोपवला जात नाही.

> मुख्य धर्मपीठांप्रमाणे अवांतर मठांचे शिष्यस्वामी आणि त्यांचे अनुयायी धर्माचा प्रसार व प्रचार करतात तर मुख्य शंकराचार्य देशपातळीवरील धर्मकार्यात, चर्चेत आपले योगदान देतात.