‘ती’, कार्यकर्तृत्वाने काकणभर सरसच

289

>>ज्योत्स्ना गाडगीळ

आजची ती. कणखर… सक्षम… आपापल्या क्षेत्रात कार्यकर्तृत्वाने काकणभर सरसच ठरलेली. आपल्या माणसांच्या जबाबदाऱ्यांतून… लडिवाळ ओझ्यातून तिला मुक्त व्हायचंच नाहीए. उलट हा आनंद उरापोटावर वागवून पुन्हा तिला जग जिंकायचंय… जिंकतेही ‘ती;. तिच्या कर्तृत्वाने… बुद्धीने… पण या साऱ्यासोबत तिला स्वतंत्र व्हायचंय ते मनाने… आत्म्याने… आपल्या भवतालच्या स्वकीयांच्या… जोडीदाराच्या सामंजस्याने…

सायली मराठे

sayalee-maratheचांगल्या पगाराची नोकरी, देशोदेशीचा प्रकास, उत्तम सहकारी आणि बढतीची संधी असे सहसा जुळून न येणारे योग एखाद्याच्या वाटय़ाला यावेत आणि त्या व्यक्तीने नोकरी सोडून व्यवसायाला सुरुवात करावी आणि तो व्यवसायही उत्तम चालावा, याला आपण त्या व्यक्तीचे ‘नशीब बलवत्तर’ म्हणू! पण नशिबालाही कर्तृत्वाची जोड ही लागतेच. हेच सिद्ध करून दाखवलंय हरहुनरी ज्वेलरी डिझायनर सायली मराठे हिने! तिचे ‘आद्या’ हे ज्वेलरी ब्रँड समाजाच्या सर्व स्तरातील महिलांमध्ये लोकप्रिय आहे. सायली व्यवसायाने अभियंता होती. साडेनऊ वर्षे नोकरीचा अनुभव घेतल्यानंतर तिला आपल्या दागिने बनवण्याच्या छंदाचे व्यवसायात रूपांतर करावेसे वाटले. चांदी आणि सोन्याचा मुलामा दिलेले दागिने, कांस्य, तांबे, मणी, मूल्यवान रत्न, ऑक्सिडाईडचे दागिने तिने बनवले… आणि पाहता पाहता तिचे ‘आद्या’ हे ब्रँड देश-विदेशातही नावाजले जाऊ लागले. अनेक ज्वेलर्सनी त्यांच्यासाठी काम करण्याची सायलीला ऑफर दिली. परंतु तिने स्वतःची वाट स्वतःच घडवली आणि यशस्वी उद्योजिका बनली.

मेघना एरंडे

meghna-erandeनोकरी, व्यवसाय या पलीकडेही स्वतःचा छंद जोपासून प्रसिद्धी आणि पैसा कमवता येऊ शकतो, हे सिद्ध केलंय व्हॉईस आर्टिस्ट मेघना एरंडे-जोशी हिने! बालदोस्तांचे आवडते कार्टून कॅरेक्टर ‘बॉब द बिल्डर’, ‘जॉर्ज’, ‘निन्जा हातोडी’, ‘एल्सा’ यांना बोलते करणारी, बॉलिवूड आणि हॉलिवूड तारकांचा आवाज बनलेली, पुणे रेल्वे स्थानकावर रेल्वेसूचना देणारी, डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिक वाहिनीवर हिंदीतून माहिती पुरवणारी आणि अनेक हिंदी, मराठी मालिका, जाहिराती, चित्रपट यातून झळकणारी हरहुनरी डबिंग आर्टिस्ट मेघना सर्वांच्या परिचयाची आहे. व्हॉईस जगतात स्पर्धा असूनही त्यात आपल्या आवाजाचे वेगळेपण दाखवून मेघनाने आपले अस्तित्व टिकवले आहे. आपल्याला आवडणारे काम मनापासून केले, तर अपेक्षित यश मिळते, याचा वस्तुपाठ तिने घालून दिला आहे.

जयंती कठाळे

jayanti-kathaleआयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या जयंती कठाळे आता खाद्यक्षेत्रात ऐटीत वावरत आहेत. परदेश प्रवास, तेथील मुक्काम, तसेच बंगळुरूसारख्या अमराठी ठिकाणी होणारी जेवणाची आबाळ, यासाठी जयंती यांनी खाद्यक्षेत्रात पाय रोवायचे ठरवले. त्यातून साकारले ‘पूर्णब्रह्म!’ महाराष्ट्रीय शाकाहारी पदार्थ देणारे हे खाद्यगृह त्यांनी बंगळुरुत सुरू केले आणि सहा वर्षांच्या प्रवासात परदेशात फ्रँचायझी सुरू करण्यापर्यंत मजल मारली. त्यांनी महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या लोकांना उत्तम मराठी खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले आहेत. त्यांच्याकडे फ्रँचायझीसाठी महिला उद्योजिकांना प्राधान्य दिले जाते आणि सवलतीही दिल्या जातात. बर्गर-पिझ्झा या परदेशी खाद्यपदार्थाच्या १८ हजार शाखा देशभरात चालू शकतात, तर देशी पदार्थाच्या किमान ५००० शाखा जगभरात नक्कीच चालू शकतात, ही महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून जयंती यांची घोडदौड वेगाने सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या