दुर्दैव! घरात पूजा करताना भाजले, माजी पालिका आयुक्त नलिनाक्षन यांचे निधन

मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त के. नलिनाक्षन यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे. घरात पूजा करताना भाजल्यामुळे त्यांच्यावर भायखळ्यातील मसीना रुग्णालयात उपचार सुरू होते.

चर्चगेट येथील ‘ए’ मार्गावरील शर्विले इमारतीत नलिनाक्षन कुटुंबासोबत राहत होते. नलिनाक्षन बुधवार, 7 जुलैला नेहमीप्रमाणे घरातील देवघरात पूजा करत असताना त्यांच्या लुंगीने पेट घेतल्याने ते भाजले. त्यावेळी देवघर असलेली खोली आतून बंद असल्याने ते 80 ते 90 टक्के भाजले. त्यांना तातडीने मसीना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. भारतीय सनदी सेवेतील (आयएएस) 1967 च्या तुकडीचे अधिकारी असलेले नलिनाक्षन यांनी 1999-2001 कालावधीत मुंबई महापालिकेत आयुक्तपद भूषवले होते. त्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव पदासह अन्य विभागांचा कार्यभार सांभाळला होता.

आपली प्रतिक्रिया द्या