कबड्डी… कबड्डी…

जयेंद्र लोंढे

सध्या हिंदुस्थानात प्रो-कबड्डी स्पर्धेचे वारे जोरात वाहू लागले आहेत. कबड्डी या महाराष्ट्राच्या मातीतल्या खेळाला या स्पर्धेने आंतरराष्ट्रीय क्षितिजावर नेऊन ठेवले आहे. आता हिंदुस्थानातच नव्हे तर परदेशातही कबड्डी… कबड्डीचा… दम घुमू लागलाय. यावेळचे प्रो-कबड्डीचे मुख्य आकर्षण असणार आहे पुणे-मुंबईचा राजदूत अंकुश चौधरी… यानिमित्ताने अंकुशबरोबरच मुंबईचा कर्णधार अनुप कुमार आणि पुण्याचा कर्णधार दीपक हुडा यांच्याशी मारलेल्या गप्पा

अंकुश चौधरी ( ब्रँण्ड अॅम्बेसेडर, प्रोकबड्डी, मुंबईपुणे)

शाळेत असताना खेळण्याचा अनुभव

कबड्डी या खेळाशी लहानपणीच संबंध आला. आर.एम.भट शाळेत असताना कबड्डी खेळत होतो. कॉलेजमध्ये प्रवेश केल्यानंतर  तसेच आता या अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर कबड्डीपासून थोडा दूर झालो. पण प्रो-कबड्डीच्या मागील दोन मोसमांतील लढती आवर्जून बघितल्या असून आता कबड्डीकडे पुन्हा एकदा माझी पावले वळली आहेत, असे अंकुश चौधरीने नमूद केले.

महाराष्ट्राकडेच कप राहणार

यू मुंबा व पुणेरी पलटण हे दोन्ही संघ महाराष्ट्रातीलच आहेत. त्यामुळे या दोन्हींपैकी कोणत्याही एका संघाने यंदा जेतेपद पटकावल्यास प्रो-कबड्डीची मानाची ट्रॉफी आपल्या राज्यातच राहील. याचा आनंद काही औरच असेल, असे उद्गार अंकुश चौधरीने यावेळी काढले.

सेलिब्रिटींचे कबड्डी सामने व्हायला हवेत

आतापर्यंत आम्ही कलाकार क्रिकेटसाठी एकत्र आलो.  एक महिन्याच्या त्या स्पर्धेसाठी तीन ते चार महिने तयारी करावी लागते. अगदी त्याचप्रमाणे या खेळामध्येही आम्हाला चुणूक दाखवायला नक्कीच आवडेल. कबड्डीचे सामने झाल्यास मजा येईल, असे आनंदाने अंकुश चौधरीने म्हटले.

काशिलिंग भन्नाट, तर अनुप कूल कर्णधार

यू मुंबाचा मराठमोळा खेळाडू काशिलिंग अडके भन्नाट चढाई करतो. तो चढाई करीत असताना थेट घुसतो. तसेच यू मुंबाचा कर्णधार अनुप कुमार हा एकदम ‘कूल’ आहे, असे अंकुश चौधरी पुढे म्हणाला.

ब्रॅण्ड ऍम्बेसेडर झाल्याचा अभिमान वाटतो

कबड्डी हा आपल्या मातीतला खेळ आहे. त्यामुळे साहजिकच ब्रॅण्ड ऍम्बेसेडर झाल्याचा अभिमान आहे. कबड्डीची खरी गंमत म्हणजे लढत पाहताना आपणही हलू लागतो. तो थरार वेगळाच असतो, असे तो म्हणाला.

दीपक हुडा (कर्णधार, पुणेरी पलटण)

जबाबदारी वाढली, दबाव नाही

या वर्षी पुणेरी पलटण संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी माझ्या खांद्यावर सोपवण्यात आलीय. यामुळे माझ्यावर दबाव वाढलाय असे मी म्हणणार नाही. मात्र जबाबदारी नक्कीच वाढलीय. कबड्डीच्या मॅटवर दबाव घेऊन खेळल्यास संघाला कंट्रोलमध्ये कसे ठेवू शकतो. त्यामुळे या मोसमात प्रेशरमध्ये खेळणारच नाही, असे दीपक हुडाने आत्मविश्वासाने सांगितले.

आमचा ताळमेळ अन् समन्वय चांगलाच

यंदा स्पर्धेत १२ संघ आहेत. प्रत्येक संघात बदल झालेत. माझे नशीब चांगले आहे, कारण पुणेरी पलटणमध्ये जे कबड्डीपटू आहेत त्यांच्यासोबत आधीपासूनच माझे तार जुळलेत. संदीप नरवालसोबत कबड्डी खेळतच मोठा झालो. आम्ही हरयाणासाठी एकत्र खेळलोय. त्यानंतर राजेश मोंडल, धर्मराज चेरालथन, गिरीश इरनक यांच्यासोबत हिंदुस्थानच्या संभाव्य चमूत खेळण्याचा अनुभव मिळवलाय. तसेच उमेश म्हात्रे, रिंकू नरवाल यांच्यासोबत एअर इंडियामध्ये खेळलोय. एकूणच काय तर इतर संघांप्रमाणे समन्वय साधण्यासाठी आमच्या संघाला वेळ लागला नाही, असे दीपक हुडा याने आवर्जून सांगितले.

बेंचवर बसलेल्या खेळाडूंना संधी

यंदाची कबड्डी स्पर्धा तीन महिने रंगणार आहे. त्यामुळे यावेळी प्रत्येक संघातील कबड्डीपटूंच्या फिटनेसचा कस लागेल हे निश्चित आहे. पण मी याकडे दुसऱया बाजूने बघतोय. तीन महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये बेंचवर बसलेल्या कबड्डीपटूंना प्रत्यक्षात खेळण्याची संधी मिळेल. त्यांनाही आपला खेळ दाखवता येईल, असे दीपक हुडा यावेळी म्हणाला.

कोणत्याही संघाला कमी लेखू नये

कबड्डी या खेळामध्ये क्षणाक्षणाला सामन्याचा नूर बदलत असतो. यंदाच्या स्पर्धेची सुरुवातही तशीच झालीय. त्यामुळे आमच्या गटात कोणता संघ तगडा आणि कोणता संघ कमकुवत याबाबत सांगणे कठीण आहे. आम्ही कोणत्याही प्रतिस्पर्ध्यांना कमी लेखणार नाही, असे दीपक हुडा स्पष्टपणे सांगतो.

अनुपकुमार (कर्णधार, यूमुम्बा)

प्ले ऑफमध्ये आरामात पोहचू

पहिल्या तीन मोसमांत आमच्या खेळाडूंनी दमदार खेळ केला. आमच्यात योग्य समन्वय जुळून आला; पण चौथ्या मोसमात आम्हाला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. पण यंदाच्या मोसमात पेपरावर आमचा संघ स्ट्राँग आहे. संघातील प्रत्येक खेळाडूने आपल्या क्षमतेच्या ७० ते ८० टक्के खेळ केल्यास ‘यू मुंबा’ आरामात प्ले ऑफमध्ये पोहचेल, असा आत्मविश्वास अनुपकुमारने यावेळी व्यक्त केला.

चॅलेंजिंग मोसम

यंदा प्रो कबड्डी तीन महिने रंगणार आहे. त्यामुळे हा मोसम प्रत्येक संघासाठी चॅलेजिंग असेल यात वाद नाही. तसेच अखेरच्या लढतींपर्यंत  आगेकूच करण्यासाठी बारा संघांमध्ये चुरस रंगेल, असे त्याला वाटते.

राकेशकुमारची अनुपस्थिती जाणवतेय

यू मुंबाच्या संघामध्ये यंदा इतर संघाप्रमाणेच बदल झालेत. यावेळी मला राकेशकुमार या अनुभवी खेळाडूची आठवण होत आहे. मागच्या मोसमात त्याने चांगला खेळ केला होता. यंदा यू मुंबामध्ये तो हवा होता, असे अनुपकुमार न विसरता म्हणाला.

बरीच वर्षे कबड्डी खेळतोय; बदल करणे कठीणच!

यंदा चढाईत बदल करण्याबाबत त्याला विचारले असता तो म्हणाला, मी बरीच वर्षे कबड्डी खेळतोय. त्यामुळे चढाईत किंवा खेळात मोठा बदल करणे कठीणच असेल, असे अनुपकुमार सांगतो.

डेहराडूनचा सरावाचा फायदा होम लेगमध्ये होणार

प्रशिक्षकांनी आमच्याकडून डेहराडून येथे कसून सराव करवून घेतला. होम लेग अर्थात मुंबईत आमच्या घरच्या मैदानावर सलग सहा दिवस आम्ही सामने खेळू तेव्हा या सरावाचा फायदा नक्कीच होईल, असे तो स्पष्ट करतो.

 

आपली प्रतिक्रिया द्या