कबड्डी खेळता खेळता अचानक कोसळला, खेळाडूचा मैदानातच करुण अंत

कबड्डी खेळता खेळता एक खेळाडूचा मैदानातच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ओडिशात घडली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खगेश्वर राठिया असे मयत खेळाडूचे नाव आहे.

नुआपाडा जिल्ह्यातील तारबोड गावात कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सोनीस्ता पोटापारा संघ आणि हतिसरा संघात सामना सुरू होता. सामना सुरु असतानाच हतिसरा संघातील खगेश्वर राठिया हा खेळाडू अचानक खाली कोसळला.

आयोजन समिती आणि अन्य खेळाडूंनी त्याला तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे त्याची प्रकृती आणखी बिघडल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र जिल्हा रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सामन्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवत असताना ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.