एअर इंडियाला जेतेपद

33

सामना ऑनलाईन, वडाळा

एअर इंडियाने नवव्या औद्योगिक राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महिंद्रा आणि महिंद्रा या संघाचा ५२-३० असा पाडाव करीत विजेतेपदाचा चषक व रोख रु. दोन लाखांची कमाई केली.

उपविजेत्या महिंद्राला रोख रु. एक लाखांचे इनाम मिळाले. स्पर्धेत सर्वोत्तम ठरला तो महिंद्राचा आनंद पाटील. त्याला महिंद्रा ज्युपिटर देऊन सन्मानित करण्यात आले. एअर इंडियाचे या स्पर्धेतील हे तिसरे जेतेपद. पिंपरी-चिंचवड या पहिल्या स्पर्धेत त्यांना हे यश मिळाले होते. त्यानंतर अमरावती येथे झालेल्या स्पर्धेत त्यांना दुसऱ्यांदा ही संधी प्राप्त झाली. होसंगाबाद मध्य प्रदेश येथे झालेल्या अंतिम सामन्यात एअर इंडियाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करीत पूर्वार्धातच २४-१३ अशी आघाडी घेत विजयाच्या दिशेने आगेकूच सुरू केली होती. अजय ठाकूर, राहुल चौधरी यांच्या चढाया त्याला टी. विजयनची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हा विजय सहज शक्य झाला. आनंद पाटील, ओमकार जाधव, स्वप्नील शिंदे यांचा खेळ महिंद्राचा पराभव टाळण्यात कमी पडला. महिंद्राला दोन वेळा अंतिम फेरीत पोहोचूनही विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे. स्पर्धेत उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकडपटू म्हणून अजय ठाकूर व टी. विजयन यांची निवड झाली.

आपली प्रतिक्रिया द्या