८३ च्या वर्ल्डकपचा थरार पडद्यावर, प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता

सामना ऑनलाईन । मुंबई 

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या चित्रपटांतून दिसून आलेला नवाजुद्दीन सिद्दीकी आता एका नव्या भूमिकेत दिसून येणार आहे. यापूर्वी ‘फ्रिकी अली’ या चित्रपटातून गोल्फच्या खेळाडूच्या भूमिकेतून नवाजुद्दीन झळकला होता. तसेच ‘ठाकरे’ चित्रपटामधून ही त्यानं हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारली आहे.

कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटाची कथा १९८३मध्ये हिंदुस्थानानं जिंकलेल्याच्या वर्ल्डकप स्पर्धेवर आधारित आहे. तसेच रणवीर सिंह हा ऑलराऊंडर कपिल देव यांची मुख्य भूमिका साकारणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार या चित्रपटातील इतर भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची नावं अजून पुढं आली नाहीत.

nawazuddin-13

नवाजुद्दीननं यापूर्वी कबीर खानसोबत ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात काम केलं होतं. परंतु कबीर खानने आता नवाजुद्दीनला त्याच्या आगामी चित्रपटासाठी क्रिकेटच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेकरता विचारले आहे. यावर नवाजुद्दीननं कबीर खानला याबद्दल अजून उत्तर दिले नसल्याची चर्चा सुरू आहे.

१९८३ साली झालेल्या सामन्यात ‘प्रोडेंशियल कप’ जिंकून हिंदुस्थानच्या संघानं क्रिकेटच्या इतिहासात आपलं नाव कोरलं आहे. तसेच २५ जून १९८३ रोजी लंडनच्या मैदानावर वेस्ट इंडिज विरुद्ध सामना खेळून हिंदुस्थानच्या संघाने वर्ल्डकप जिंकला होता. आता नवाजुद्दीन प्रशिक्षकाच्या भूमिकेत पूरेपूर उतरणार का ? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. तसेच नवाजुद्दीन सिद्दीकीच्या या आगामी चित्रपटाचे शूटिंग या वर्षी चालू होणार असून ऑगस्ट,२०१९ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.