आमचे मतदार उन्हाळ्याच्या सुट्टीवर गेल्याने पराभव !

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशभरातील पोटनिवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्लेला भारतीय जनता पक्ष पराभवाची अजब कारणं देताना दिसत आहे. उत्तर प्रदेशमधील कैरानामध्ये झालेल्या लोकसभा आणि नुरपूरमधील विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला. भाजप समर्थक मुलांसह उन्हाळ्याच्या सुट्टीवर गेले म्हणून कैरानात पराभव झाला असे अजब उत्तर योगी सरकारमधील मंत्र्याने दिले आहे. उत्तर प्रदेशचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी पराभवाचे हे अजब कारण दिले आहे.

एएनआयशी बोलताना लक्ष्णी नारायण चौधरी यांनी हे वक्तव्य केलं आहे. ‘पोटनिवडणूक आणि लोकसभा-विधानसभा निवडणूक यामध्ये फरक आहे. पोटनिवडणुकीपेक्षा लोकसभा-विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने मतदार मतदान करतात. लहान मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे आमचे समर्थक आणि मतदार फिरायला बाहेरगावी गेल्याने भाजपचा दोन्ही जागेवर पराभव झाला,’ असे वक्तव्य लक्ष्मी नारायण चौधरी यांनी केलं आहे.

कैरानात ‘जिन्ना नाही गन्ना’

भाजपचे खासदार हुकूम सिंह यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कैराना लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले होते. भाजपने हुकूम सिंह यांची कन्या मृगांका सिंह यांना उमेदवारी दिली. तर, राष्ट्रीय लोकदलाने तबस्सुम हसन यांना रिंगणात उतरविले. तबस्सुम हसन यांना सपा, बसपा आणि काँग्रेसने पाठिंबा दिला. अजितसिंग यांच्या राष्ट्रीय लोकदलाचे पश्चिम उत्तरप्रदेशात वर्चस्व मानले जाते. त्यामुळे सर्व विरोधकांनी एकत्र येऊन तबस्सुम हसन यांना पाठिंबा दिला. निवडणुकीच्या तोंडावर भाजपने अलिगढ विद्यापिठातील बॅरिस्टर जिन्ना यांच्या छायाचित्राचा मुद्दा तापविला होता. मात्र, अजितसिंग यांचे पुत्र जयंत चौधरी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हात घातला आणि ‘जिन्ना नहीं गन्ना’ ही घोषणा दिली. त्यांची ही घोषणा लोकप्रिय ठरली. शेतकऱ्यांनी एकजुटीने भाजपविरुद्ध संताप प्रकट केला. २०१४ मध्ये तब्बल २.४० लाख मतांनी भाजपने जिंकलेली कैरानाची जागा अवघ्या चार वर्षांत ५५ हजार मतांनी गमावली आहे. राष्ट्रीय लोकदलाच्या तबस्सुम हसन यांना ४८११८२ मते मिळाली तर, भाजपच्या मृगांका सिंह यांना ४३६५७४ मते मिळाली.

नूरपूरमध्येही पराभव

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विधानसभा पोटनिवडणुकीतही झटका बसला. सपाचे नईमुल हसन यांनी भाजपच्या अवनी सिंह यांचा ५६६२ मतांनी पराभव केला. हसन यांना ९४८७५ मते मिळाली तर, अवनी सिंह यांना ८९२१३ मते मिळाली. यापूर्वी ही जागा भाजपकडे होती.