काजोलच्या हस्ते अजयच्या मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

सामना ऑनलाईन । मुंबई

चित्रपट, मालिका किंवा नाटक.. काहीही असो, मनोरंजनाचं जग म्हटलं की तिथे वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या असतात. अशाचप्रकारे काही दिवसांअगोदर अभिनेते नाना पाटकेर आणि अजय देवगण चर्चेचा विषय बनले होते. असं म्हटलं जात होतं की अजय देवगण पुन्हा एकदा मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे. पण या सर्व गोष्टी खऱ्या आहेत. ‘विटी दांडू’ या मराठी चित्रपटानंतर अजय देवगणला पुन्हा एकदा मराठी सिनेमा खुणावू लागला आहे. अजय देवगणच्या आगामी मराठी चित्रपटात नाना पाटेकर प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

नुकताच अजय देवगण निर्मित मराठी चित्रपटाचा मुहूर्त अभिनेत्री काजोल हिच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी नाना पाटेकर, सुमीत राघवन, इरावती हर्षे आदी कलाकार उपस्थित होते. अजय देवगण सोबत, अभिनव शुक्ला आणि नाना पाटेकर पण मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहेत आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे करणार आहेत. अजय देवगण फिल्म्स अँड वॉटरगेट मोशन पिक्चर्स आणि श्री गजानन चित्र यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे डीओपी सुहास गुजराथी आहेत.

या चित्रपटाचा जॉनर थ्रिलर आहे असं सांगितलं जातंय. अजय देवगण यांची मराठी चित्रपट निर्मिती, नाना पाटेकरांची प्रमुख भूमिका आणि सतीश राजवाडे दिग्दर्शित थरारपट अशी मनोरंजन त्रिवेणी प्रेक्षकांना लाभणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या