कळंबमध्ये आगळ्यावेगळ्या विवाहसोहळ्यांची चर्चा; वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी दिली पुस्तकांची भेट

‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने’ या जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात अंदोरा व कळंब या दोन ठिकाणी आगळ्यावेगळ्या पद्धतीने विवाह सोहळे करण्यात आले. या विवाहसोहळ्यांची सर्वत्र चर्चा आहे. वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी या विवाहसोहळ्यात अभिनव कल्पना राबवण्यात आली.

जुन्या विचारांना तिलांजली देत अंदोरा (ता. कळंब) येथील लग्नकार्यात भांड्याकुंड्यांचा आहेर न देता चक्क लाखभर रूपयांची महापुरूषांची पुस्तके डॉक्टर संदिप तांबारे यांनी मावसबहीणीच्या लग्णात नवविवाहीत डॉक्टर दांपत्यांना भेट दिली. शहरातील पोलीस कर्मचारी मेजर पांडुरंग राऊत यांच्या मुलीच्या लग्नात आलेल्या पाहुण्यांना भेट म्हणून संविधानाच्या 350 प्रती देण्यात आल्या. या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्यामुळे समाजात वाचन संस्कृती वाढेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

लग्न म्हटले की बँडबाजा, डीजे, रुखवंत हे सर्व येतेच. मात्र, कळंब तालुक्यातील आंदोरा येथे आगळावेगळा विवाह सोहळा बघायला मिळाला. आंदोरा येथील डॉ.संदीप तांबारे यांची मावसबहीण डॉ.रेवती (MBBS )हिचा विवाह कोल्हापूर येथील डॉ.अभिजित शिंदे ( MD )यांच्याशी शिवधर्म पध्दतीने पार पडला. अक्षदांऐवजी वधूवरांवर फुलांची उधळण करण्यात आली. वाचनसंस्कृतीला चालना मिळावी व महामानवांचे विचार समजावेत, यासाठी या नवदांपत्यांना भारतीय सविधान, छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजी महाराज, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे, संत तुकाराम महाराज यासह विविध पुस्तके भेट देण्यात आली. नवदाम्पत्य या महापुरूषांच्या चरित्राचे वाचन करुन ते विचार आत्मसात करतील त्यांना जीवनात कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. तसेच ते समाजात आदर्श कुटुंब सिद्ध होतील. या हेतूने त्यांना लाखभर रूपयांची पुस्तके भेट दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्यसनमुक्ती सेलचे अध्यक्ष डॉ.संदीप तांबारे यांनी सांगितले.

कळंब येथे संविधानाच्या 350 प्रतींचे वाटप
काहीजण लग्नकार्यात सामाजिक भान ठेवत वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे कळंब येथील मेजर पांडुरंग राऊत यांच्या कुटुंबात अनोख्या पद्धतीने विवाह सोहळा सुरमई मंगल कार्यालयात संपन्न झाला आहे. मेजर पांडुरंग राऊत यांची कन्या आणि बनसोडे परिवार यांचा विवाह निश्चित झाला. हा विवाह संविधान वाटप पद्धतीने करायचा निर्णय दोन्ही नवदांपत्यांनी घेतला होता. बोधाचार्य सुनील गायकवाड यांनी बौध्द पद्धतीने मंगलविधी पार पाडला. लग्नमंडपात देशसेवा बजावणाऱ्या वीर जवानांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर पाहुण्यांना आहेर देण्याऐवजी तब्बल संविधानाच्या 350 प्रतींचेवाटप करण्यात आले. लग्नाच्या सर्व रूढी परंपरांना फाटा देत कळंब येथे संविधान वाटप करुन एक अनोखा लग्न सोहळा पार पडला आहे. या दोन्ही विवाह सोहळ्याची चर्चा जिल्ह्यात होत आहे.