अल्पवयीन मुलाच्या नरबळी प्रकरणी आत्यासह 6 आरोपींना जन्मठेप, कळंब तालुक्यातील घटना

कळंब तालुक्यातील पिंपळगाव (डो) येथील कृष्णा गोरोबा इंगोले या सहा वर्षीय बालकाच्या नरबळी प्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या मयत बालकाच्या आत्या, चुलता, चुलती, आजोबांनी एका मांत्रिकाच्या सांगण्यावर हे कृत्य केल्याचे तपासात उघड झाले होते.

26 जानेवारी 2017 रोजी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर कृष्णा हा आपल्या घरी आला होता. आता कृष्णा अचानक गायब झाल्याने तसेच शोधा-शोध करुनही तो सापडत नसल्याने पोलिसात तक्रार दिली होती. 27 जानेवारी रोजी शेतामध्ये कृष्णाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सुनिल नेवासे यांनी करुन या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

सदरील खटला क्र. 31/2017 ची सुनावनी सत्र न्यायालय क्र.- 1 एम. जी. देशपांडे यांच्या समोर झाली. यात सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता एस. एस. सुर्यवंशी यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.

या प्रकरणात मयत कृष्णाची आत्या द्रौपदी पौळ हिने त्याला बोलावून घेतल्याचे समोर आले. त्याला आरोपी उत्तम इंगोले यांच्या घराच्या मागील समाईक विहिरीजवळ दाट झाडीत घेवून गेली. त्याच ठिकाणी आत्याने इतर आरोपीच्या मदतीने कृष्णाचा नरबळी दिल्याचे सिध्द झाले.

त्यामुळे न्यायालयाने आरोपी उत्तम भिवाजी इंगोले, उर्मीला उत्तम इंगोले, लखन श्रीरंग चावडेकर उर्फ राहुल, लक्ष्मी बाबु पोळ उर्फ द्रौपदी, साहेबराव प्रल्हाद इंगोले, सुवर्णा दिपक भडाले (सर्व रा. पिंपळगांव (डोळा), ता. कळंब) यांना  कलम- 34, 120 (ब), 302, 363, 364 सह महाराष्ट्र नरबळी, अमानवी, अघोरी कृती व काळा जादू प्रतिबंधक कायदा कलम- 3 (2) च्या अपराधाबद्दल दोषी ठरवण्यात येऊन सर्व आरोपींना जन्मठेप तसेच साठ हजार दंडाची शिक्षा सुनावली.  ठोठावण्यात आलेल्या एकुण 60 हजार दंडा पैकी 30 हजाराची रक्कम ही मयत बालक- कृष्णा याचे आई- वडील सारिका व गोरोबा इंगोले यांना नुकसानभरपाई म्हणून दिली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या