कळंबा कारागृहातून गांजासह चार मोबाईल जप्त

48

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर

कळंबा मध्यवर्ती कारागृहात मुरूम टाकण्यासाठी आलेल्या ट्रकमधून २५० ग्रॅम गांजासह चार मोबाईल आणि २०० रूपये रोख जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी ट्रकचालाकाला ताब्यात घेतले असून, जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होते. लक्ष्मण मल्लप्पा धनगर (वय ३२, रा. पिराची वाडी, वाशी, ता. करवीर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.

मुरूम टाकण्यासाठी लक्ष्मण धनगर हा आपली ट्रक घेऊन आज कळंबा कारागृहात आला होता. कारागृहातील पोलिसांना या ट्रकचा संशय आल्याने त्यांनी ट्रकची झडती घेतली असता, चालकाच्या सिटमागे असलेल्या पिशवीत २५० ग्रॅम गांजा, सहा मोबाईल संच आणि शंभर रूपयांच्या दोन नोटा आढळून आल्या. दरम्यान, सतर्क सुरक्षायंत्रणेमुळे या वस्तु कैद्यांपर्यंत पोहोचण्यापुर्वीच त्या ताब्यात घेण्यात आल्या असल्या, तरी यापुर्वीचा अनुभव पाहता यामागील खऱ्या सुत्राधारापर्यंत पोलीस पोहोचतील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

यापूर्वीच्या तपासाचे काय झाले?

यापूर्वीही या कारागृहात गांजा, मोबाईल आढळून आला होता. शिवाय कैद्यांची दारू पार्टीही उजेडात आली होती. याप्रकरणाचा झालेला तपास कधी पुढे आला नाही. आता याप्रकरणीही होणाऱ्या तपासापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या