कळंबा कारागृहात कैद्यांची हाणामारी, एकाचा मृत्यू; 6 कैद्यांवर खुनाचा गुन्हा

कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये झालेल्या हाणामारीत एका कैद्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कारागृहातच शिक्षा भोगत असलेल्या सहा कैद्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पुण्यातील दोन नामचिन गुंडांचा समावेश आहे. कारागृहात झालेल्या या खुनामुळे कारागृह प्रशासन हादरून गेले असून, पोलिसांकडून या खुनाचा तपास सुरू आहे.

निशिकांत बाबूराव कांबळे (वय 47, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) असे मृत कैद्याचे नाव असून, सचिन राजाराम ढोरे-पाटील (वय 35), अक्षय तुकाराम काळभोर (वय 30, दोघे रा. पुणे), इलियास मुसा मुल्ला (वय 35, रा. सांगली), बबलू संजय जावीर (वय 32, रा. कोल्हापूर), किरण ऊर्फ करण प्रकाश सूर्यवंशी (वय 38, रा. खानापूर, जि. सांगली) आणि शिवाजी तिपन्ना कांबळे (वय 40, रा. कोल्हापूर) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.

संशयित शिवाजी कांबळे आणि कैदी निशिकांत कांबळे यांच्यात गुरुवारी सायंकाळी किरकोळ शिवीगाळ व वादावादी झाली. निशिकांतने पाण्याच्या नळाजवळील फरशी उखडून शिवाजी कांबळेच्या दिशेने भिरकावली. या दोघांमध्ये पुन्हा हाणामारी होऊन जखमी शिवाजी कांबळेने कारागृहातील अन्य साथीदारांना बोलाविले. त्यानंतर शिवाजी कांबळेसह सहा कैद्यांनी निशिकांतवर हल्ला चढवीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात त्याचा रक्तदाब कमी झाला. त्याला उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.