माझ्यासाठी ‘कालीमाता’ ही मांस खाणारी आणि दारू वर्ज्य नसलेली देवी आहे! महुआ मोईत्रा

‘काली’ या माहितीपटाच्या पोस्टरवरून सध्या मोठा वाद सुरू झाला आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये काली ही हिंदू देवता सिगारेट ओढताना दाखविल्यामुळे हा वाद पेटला आहे. आता या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी आपली भूमिकाही सांगितली आहे. इंडिया टुडेशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की माझ्यासाठी ‘कालीमाता’ ही मांस खाणारी आणि दारू वर्ज्य नसलेली देवी आहे

इंडिया टुडेशी संवाद साधताना मोइत्रा यांनी सांगितले की, माझ्यासाठी काली म्हणजे मांसप्रेमी आणि दारू स्वीकारणारी देवी आहे. लोकांची याबद्दल वेगवेगळी मते आहेत, मात्र मला त्याची काहीच हरकत नाही. हिंदू असूनही मला माझ्या काली मातेला पाहण्याचे स्वातंत्र्य आहे आणि तसे स्वातंत्र्य इतर लोकांनाही असायला हवे. तुमच्या देवाची तुमच्या पद्धतीने पूजा करण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला हवे.

भूतान आणि सिक्कीममध्ये गेल्यास तिथल्या पूजेत देवाला व्हिस्की अर्पण केली जाते. पण तीच व्हिस्की उत्तर प्रदेशातील एखाद्या मंदिरात प्रसाद म्हणून दिली तर लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, असे मोईत्रा यांनी म्हटले. तारापीठाचा उल्लेख करून त्या म्हणाल्या की, तिथे गेल्यास तुम्हाला काली मंदिराजवळ ऋषीमुनी धुम्रपान करताना आढळतील.

‘काली’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये हिंदू देवता कालीमाता सिगारेट ओढताना दाखवण्यात आली आहे. एवढेच नाही तर कालीमातेच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात एलजीबीटी समुदायाचा रंगीत ध्वज देण्यात आला आहे. या दोन गोष्टींवरून सध्या वाद सुरु आहे. अशातच खासदार महुआ मोइत्रा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या चित्रपटाच्या निर्मात्या लीना मनिमेकलाई यांच्याविरोधात सोशल मीडियावर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तसेच लीना मनिमेकलाई यांच्या अटकेची मागणीही अनेक जण करत आहेत. या वादग्रस्त पोस्टर प्रकरणी दिल्ली पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 153A आणि 295A अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.