कळसुबाई शिखरावर नामकरण सोहळ्याद्वारे राबवली गड किल्ले जनजागृती मोहिम

गिर्यारोहणाचा छंद नगरच्या अनेक युवक-युवतींनी जोपासला आहे. या छंदाच्या माध्यमातून गड-किल्ल्यांबाबत जनजागृती केली जात आहे. या मोहिमेचाच एक भाग म्हणून आठ महिन्यांच्या एका चिमुरडीचा नामकरण सोहळा थेट कळसुबाई शिखरावर करण्याचा उपक्रम नुकताच राबविण्यात आला. या मुलीचे नाव ‘वसुंधरा’ ठेवण्यात आले.

नगरमधील गिर्यारोहक वैभव लोटके यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. निसर्गावर प्रेम करणारे जालना येथील दाम्पत्य विनोद आणि सपना सुरडकर यांच्या मुलीचे नामकरण थाटामाटात करण्याऐवजी कळसूबाई शिखरावर करण्याचे नियोजन करण्यात आले. समुद्रसपाटीपासून 1646 मीटर उंचीवर असलेल्या या शिखरावर हा सोहळा मोजक्याच गिर्यारोहकांच्या उपस्थितीत झाला. यावेळी कल्याण उगले यांनी लिहिलेला आणि रामानंद कल्याण यांनी संगीतबद्ध केलेला पाळणा म्हणण्यात आला.

स्त्री शक्तीचा महिमा असलेला पाळणाही यावेळी सादर करण्यात आला. कळसूबाईच्या मावळ्यांनी 175 फुटी तिरंगा फडकविला. गड किंवा किल्ल्यांचे संवर्धन होण्याची गरज आहे. तेथे कचरा टाकू नये. पर्यावरणाची हानी होणार नाही, यासाठी पर्यटकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे, असे प्रबोधन यावेळी करण्यात आले.

गिर्यारोहक वैभव लोटके यावेळी म्हणाले की, ‘जगी कीर्ती रुढावी पर्यावरण संतुलनाचा मानु वाढवी ॥ प्रदूषणापासोनी सोडावी मेदिनी ही ।।’ संत ज्ञानेश्वर महाराजांनी पर्यावरण संतुलनाबाबत ज्ञानेश्वरीमध्ये अत्यंत समर्पक भाषेत वरील वर्णन केले आहे. जीवसृष्टी किंवा पर्यावरण निरोगी राहणे, हे भावी पिढ्यांच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.