सलग 2 दिवस मध्य रेल्वेच्या गाडय़ांना लेटमार्क,कळवा रेल्वे फाटक उघडे राहिल्याचा फटका

494

कळवा रेल्वे फाटक शहरी वाहतुकीसाठी जादा वेळ उघडे राहिल्याने मध्य रेल्वेच्या लोकलना सलग दोन दिवस फटका बसला असून चाकरमान्यांना लेटमार्क बसला आहे. मध्य रेल्वेच्या लोकल त्यामुळे सकाळी ऐन पिकअवरमध्ये उशिराने धावत होत्या. मध्य रेल्वेच्या मार्गावर अजूनही रेल्वे फाटकांची समस्या कायम असून ती कायमची बंद करण्यासाठी लवकर पावले उचलण्याची मागणी होत आहे.

मध्य रेल्वेच्या लोकलना सलग दोन दिवस लेटमार्कचा सामना करावा लागत आहे. मध्य रेल्वेच्या फाटकांपैकी दिवा, आंबिवली, कळवा या रेल्वे फाटकांचा प्रचंड अडसर लोकल सेवेला बसत आहे. या भागात झालेल्या नागरीकरणामुळे वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने रेल्वे फाटके बराच वेळ उघडी ठेवावी लागत आहेत. नुकतेच ठाकुर्ली येथे उड्डाणपुलाचे काम झाल्याने हे फाटक बंद झाले आहे. दिवा आणि कळवा येथील रेल्वे फाटकांचे काम स्थानिक महापालिकांच्या सहकार्याने लवकर करण्याची मागणी होत आहे.

कळवा येथे काय झाले?

कळवा रेल्वे फाटकाजवळ रहिवाशांच्या पाण्याची पाइपलाइन दुरुस्तीकरिता खोदकाम सुरू असल्याने वाहनांना त्याचा अडसर झाल्याने हे रेल्वे फाटक बराच वेळ उघडे राहिल्याने लोकल रखडल्याचे बोलले जाते. एक लोकल काही मिनिटे जरी रखडली तरी पाठोपाठच्या सर्व लोकलना फटका बसतो. पिकअवरच्या गर्दीत त्याचा मोठा परिणाम एकूण लोकलच्या वेळापत्रकावर दिवसभरात होत असतो.

आपली प्रतिक्रिया द्या