कल्याणवरून फिरायला यायचे, पुण्यात चोरी करून जायचे

सामना ऑनलाईन । पुणे

कल्याणमधून दरमहा पुण्यात येऊन सोनसाखळी चोरणाऱ्या दोन सराईत चोरांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. परेश किशोर धावरी (२८) आणि आकाश राजेश कंडारे (२२) अशी अटक केलेल्या चोरांची नावे आहेत. हे दोघे महिन्यातून एकदा पुण्यात येत असत आणि चोरी करून जात असत. पुण्यातील औंध भागात या दोघांनी उच्छाद मांडला होता. महिन्यातून एकदाच चोरी करणाऱ्या या दोघांविरुद्ध सततच्या येणाऱ्या तक्रारींमुळे पोलिसांपुढे यांना पकडायचे कसे असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर खडकी पोलिसांनी सापळा रचून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

पोलीस उपआयुक्त दीपक साकोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, परेश किशोर धावरी (२८) आणि आकाश राजेश कंडारे (२२) दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून १९३ ग्रॅम सोन्याचे ५ लाख ९५ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने आणि इतर ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलीस चौकशीदरम्यान या दोघांनी एकूण ९ चोऱ्या केल्या असल्याचे उघडकीस आले आहे. या दोघांना पकडण्यासाठी पोलिसांना सीसीटीव्ही फोटेजची मदत झाली. तपासादरम्यान पोलिसांच्या लक्षात आले की, हे दोघेही चोऱ्या करताना नंबर नसलेल्या गाडीचा वापर करत आहेत. पोलिसांनी त्यावेळी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु ते पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेले. ७ जून रोजी सकाळी एक महिला रस्त्यावरून जात असताना त्या दोघांनी बाईकवरून येऊन महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून पळून गेले. महिलेने लगेचच पोलिसांत तक्रार करून घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध घेऊन सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेले दोघेही जिवलग मित्र असून आतापर्यंत कल्याणमध्ये त्यांच्याविरोधात सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खडकी पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये या दोघांनी नऊ प्रकरणांमध्ये चोरी केल्याचे मान्य केले आहे. त्यांच्यापैकी एका आरोपीचे नातेवाईक खडकीमध्ये राहतात. त्यांच्याच बाईकचा नंबर बदलून हे दोघे चोरी करत असत. सात महिन्यांपासून हे दोघेही चोरी करत आहेत. परंतु याबाबत कोणतीही कल्पना त्यांच्या नातेवाईकांना नव्हती.

आपली प्रतिक्रिया द्या