कल्याण-डोंबिवलीचा पाऊस मोजता येईना

39

सामना प्रतिनिधी । डोंबिवली

स्मार्टसिटीकडे वाटचाल करणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेत तापमान व पाऊस नोंदवण्याची यंत्रणाच नसल्याचा प्रकार समोर आला आहे. ही यंत्रणाच नसल्याने पालिका हद्दीत रोज किती पाऊस पडतो याची माहितीच पालिकेकडे नाही. त्यामुळे राज्यात पहिली ‘ई’ गव्हर्नस किताब मिळविणाऱ्या पालिकेकडे पर्जन्यमापक यंत्रणाच नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

ठाणे, उल्हासनगर, नवी मुंबईनंतर मुंबईजवळील सर्वात महत्त्वाची पालिका म्हणून कल्याण-डोंबिवलीकडे पाहिले जाते. कोट्य़वधींचा अर्थसंकल्प असलेल्या या महापालिकेकडे मात्र पर्जन्यमापक यंत्रणाच नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पालिकाहद्दीत दररोज किती पाऊस पडतो याची नोंदच प्रशासनाकडे नाही. स्मार्टसिटीकडे वाटचाल करणाऱ्या कल्याण-डोंबिवली प्रशासनाला या ढिसाळ कारभाराविरोधात आश्चर्य व्यक्त होत आहे.

अधिकाऱ्यांचे प्रदूषण मंडळाकडे बोट
प्रशासन मात्र हे काम महापालिकेचे नाही तर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे असल्याचे सांगून हात झटकत आहे. यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे चौकशी केली असता त्यांच्याकडेही अशी यंत्रणा नसल्याचे सांगण्यात आले. कल्याणला तहसील कार्यालयाकडे पर्जन्यमान मोजण्याची यंत्रणा आहे पण तापमान मोजण्याची यंत्रणा नाही.

पर्यावरण अहवाल सादर करून मोकळे होतात
यासंदर्भात शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते रमेश जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, प्रशासन दरवर्षी पर्यावरण अहवाल सादर करून माकळे होते. याप्रसंगी चर्चेच्या वेळी महापालिकेने तापमान व पाऊस मोजण्याची यंत्रणा निर्माण करावी अशी मागणी केली जाते. पण प्रशासन काही कारवाई करत नाही. नाशिक, पुणे महापालिकेने अशी सोय केली आहे याकडे लक्ष वेधून ते म्हणाले, शहरात ठिकठिकाणी तापमान व पर्जन्य मोजणारे फलक लावले आहेत तसे फलक आपल्याकडे का नाहीत, असा सवाल करून प्रशासनाकडे यांसदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या