बनावट आदेश तयार करून उच्च न्यायालयाची फसवणूक

सामना प्रतिनिधी । कल्याण

वडिलोर्पार्जित जमिनीच्या कागदपत्रात फेरफार करून जागेची परस्पर विक्री केल्याप्रकरणी कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असतानाच आता या प्रकरणात उच्च न्यायालयाचा बनावट आदेश तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी फिर्यादी चिंतन जोशी यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने हर्षदराय ठक्कर, पुष्पा कोलते, नीलेश जैन, प्रकाश जैन यांच्यासह १९ जणांची पोलीस नव्याने चौकशी करत आहेत.

कल्याणमधील चिंतन जोशी यांची ५.९७ गुंठे वडिलोर्पार्जित जागा कल्याण येथील शिवाजी चौकात आहे. या जागेवर शिवभवन आणि जयहरी अशा दोन इमारती आहेत. मात्र शिवभवन या इमारतीचा एका विमा कंपनीने न्यायालयाच्या आदेशाने लिलाव केला. याचा फायदा घेत प्रकाश जैन, नीलेश जैन यांच्यासह एकून सहा जणांनी शिवभवन इमारत विकत घेण्याची तयारी दाखवताच हर्षदराय ठक्कर, पुष्पा कोलते यांच्यासह १९ जणांनी शिवभवनसह जयहरी इमारतीची बनावट कागदपत्रे तयार केली.

कल्याण दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने दस्तावेजात खाडाखोड करून शिवभवनऐवजी प्रत्यक्षात जयहरी इमारत प्रकाश जैन यांनी स्वत:च्या नावे करून घेतली. याबाबतचा खटला कल्याण न्यायालयात सुरू आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान प्रकाश जैन यांनी उच्च न्यायालयाच्या एका आदेशाचा दाखला देत सदर जागा आपलीच असल्याचा दावा केला. याबाबत चिंतन जोशी यांनी हे कागदपत्र बनावट असल्याचे सांगितले.

मूळ प्रत सादर करण्याचे आदेश
उच्च न्यायालयात अर्ज करून त्या आदेशाची नक्कल मागितली असता न्यायालयाने असे कोणतेही दस्तावेज उपलब्ध नसल्याचे लिखित स्वरूपात कळवल्याची प्रत त्यांनी न्यायालयात सादर केली. तसेच ही माहिती उच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आल्याचे त्यांनी कल्याण सत्र न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे आता न्यायालयाचा बनावट आदेश तयार केल्याचे प्रकरण समोर आल्याने पुढील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाच्या आदेशाची मूळ प्रत सादर करण्याचे आदेश कल्याण न्यायालयाने प्रकाश जैन यांना दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या