कल्याण-कसारा रेल्वे सेवा 3 तासांपासून ठप्प, प्रवाशांचे हाल

>> शाम धुमाळ

शनिवार रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज पहाटे आटगाव रेल्वे स्थानकाच्या पुढे रेल्वे ट्रॅकवर झाड पडले. यामुळे कसाराकडे जाणारी वाहतूक 3 तासाहून अधिक काळ ठप्प होती. सकाळी 8 वाजता रेल्वे ट्रॅकवरील झाड काढण्यात आले आणि त्यानंतर कसाराकडे जाणारी वाहतूक सुरू झाली.

ट्रॅकवरील झाड काढल्यानंतर लोकल सेवा व मागे अडकलेल्या मेल एक्सप्रेस गाड्या कसाराकडे सोडण्यात आल्या. मात्र 3 तासाने सुरु झालेली रेल्वे सेवा लगेचच अवघ्या 15 मिनिटांनी पुन्हा बंद झाली.

वासिंद रेल्वे स्थानकाजवळ ओव्हर हेड वायरचा पोल खचल्याने रेल्वेला होणारा वीज पुरवठा बंद झाला. परिणामी वासिंदहून कसाराकडे जाणारी व कसाराहून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली. रेल्वेची वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद झाल्याची उद्घोषणा रेल्वेकडून करण्यात येत होती.

दरम्यान, यामुळे टिटवाळा ते कसारा रेल्वे स्थानका दरम्यान दोन्ही मार्गिकेवर मेल एक्सप्रेस, लोकल गाड्या अडकून पडल्या आहेत. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.