नवरा शोधत होता ‘सीमा’ला; प्रियकरासोबत सापडली ‘सना’

कल्याणमधून बेपत्ता झालेली महिला तब्बल चार वर्षांनी सापडली असून तिच्या गायब होण्यामागचे गूढ उकलले आहे. गायब होण्यामागचे सत्य समोर आल्यानंतर पतीसह कुटुंब हादरून गेले आहे. संबंधित महिला प्रियकरासोबत पळून गेली होती. यानंतर नाव बदलून ती राहात होती. लग्नापूर्वीची ‘सीमा’ आता ‘सना’ झाल्याचे पाहून सर्वांनाच धक्का बसला.

अंबरनाथमध्ये राहणारी सीमा 30 मे 2017 रोजी कुटुंबासोबत मनमाडहून रेल्वेने कल्याणला येत होती. प्रवासादरम्यान ती गायब झाली. कुटुंबीयांनी सीमा बेपत्ता झाल्याची खबर मनमाड पोलिसांत दिली. सर्वत्र शोधाशोध करूनही तिचा काहीच थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे माहेर आणि सासरचे कुटुंब सैरभैर झाले. योगायोग म्हणजे सीमा गायब झाली त्याच दिवशी कल्याणमधून शहाबाज शेख हा तरुणही बेपत्ता झाला होता. पोलिसांनी नेमका हा धागा पकडून तपास सुरू ठेवला होता. मात्र शहाबाजचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. मात्र शहाबाजच्या कुटुंबीयांच्या हालचालीवर लक्ष ठेवले होते.

असे अडकले जाळ्यात

काही दिवसांपूर्वी शहाबाजच्या काकांचे निधन झाले. त्यामुळे शहाबाज घरी येणार हे नक्की होते. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या घराजवळ पाळत ठेवली होती. शहाबाज पत्नीसह घरी आल्याची खबर मिळताच पोलिस त्याच्या घरी धडकले. त्यांची चौकशी केली असता पत्नीचे नाव सना असल्याचे सांगितले. पोलिसांनी अधिक खोलात जाऊन चौकशी केली असता सीमा हीच सना असल्याचे त्याने मान्य केले. दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्याने पळून जाण्याचे नाटक करून त्यांनी लग्न केले होते. फसवणूकप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या