भाजपने विरोधी पक्षनेते पदासाठी केला मनसेचा गेम

1262

कल्याण-डोंबिवली महापालिकेत गेली चार वर्षे शिवसेनेच्या सहकार्याने सत्तेत असलेला भाजप पक्ष आता सत्तेतून आऊट झाला आहे. 15 दिवसांपूर्वी उपमहापौरपदाचा राजीनामा दिल्यानंतर आजच्या महासभेत भाजपने विरोधी पक्षात बसत असल्याचे पत्र महापौरांना देऊन मनसेचा गेम केला. भाजपच्या पत्रामुळे मनसेला विरोधी पक्षनेते पदावर पाणी सोडावे लागले.

कल्याण-डोंबिवली महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. या पार्श्वभूमीवर गेली चार वर्षे शिवसेनेसोबत सत्तेत असलेल्या भाजपने अतिक्रमण हटवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा कांगावा करत उपमहापौरपदाचा राजीनामा दिला. यानंतर आजच्या महासभेत आम्ही विरोधी पक्षात बसत असल्याचे पत्र पीठासीन अधिकारी महापौर विनिता राणे यांना दिले. यानुसार पालिकेत क्रमांक दोनचे नगरसेवक भाजपचे असल्याने राहुल दामले यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड जाहीर करावी असे पत्र दिले. यानुसार दामले यांची विरोधी पक्षनेता म्हणून महापौरांनी निवड जाहीर केली. यामुळे मनसेचे प्रकाश भोईर यांचे विरोधी पक्षनेतेपद आपोआप रद्द झाले. याच सभेत संतोष तरे यांची राष्ट्रवादी गटनेता तर शैलेश धात्रक यांची भाजप गटनेता म्हणून निवड जाहीर करण्यात आली.

भाजपने विश्वासघात केला

शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर भाजपला आम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत अप्रत्यक्ष सहकार्य केले. मात्र विरोधी पक्ष नेतेपदावर दावा करून आमचा विश्वासघात केला, अशी उद्विग्नता मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

महासभेत रडीचा डाव

प्रशासन सत्ताधारी शिवसेनेच्या दबावाखाली काम करत असून भाजपचे ऐकत नाही, अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याची ओरड करत भाजप नगरसेवकांनी महासभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. सभा तहकूब करण्याची मागणी केली. महापौरांनी यावर चर्चा करू, असे आवाहन केल्यावरही चर्चेत भाग न घेता भाजप सदस्यांनी सभात्याग केला. भाजपचा हा रडीचा डाव असल्याचा आरोप करत अन्य पक्षांचे नगरसेवक मात्र सभा सुरळीत करण्यावर ठाम राहिल्याने भाजपचा फियास्को झाला.

 

आपली प्रतिक्रिया द्या