अमेरिकेतील शिकागो येथे सोमवारपासून डेमोक्रेटिक नॅशनल कन्व्हेन्शन (डीएनसी) सुरू झाले. हे कन्व्हेन्शन गुरुवारपर्यंत चालणार आहे. शिकागो अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अध्यक्ष जो बायडेन, फर्स्ट लेडी जिल बायडेन आणि माजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांची भाषणे झाली. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी उपराष्ट्राध्यक्ष आणि राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरीस यांच्याकडे मशाल सोपवली. त्यामुळे आता कमला हॅरीस या डेमोक्रेटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या अधिपृत उमेदवार ठरल्या आहेत.
पहिल्या दिवशी जो बायडेन यांनी भाषण केले. बायडेन स्टेजवर पोहोचताच उपस्थितांनी त्यांना थँक्यू म्हटले. व्यासपीठावर उपस्थित असलेली मुलगी अॅशले बायडेन यांना जो बायडेन यांनी मिठी मारली. या वेळी ते प्रचंड भावूक झाले होते. या वेळी ते अश्रू पुसतानाही दिसले. या कार्यक्रमाच्या अखेरच्या दिवशी कमला हॅरीस औपचारिक भाषण करतील. अमेरिकेबद्दल त्यांचे व्हिजन काय आहे आणि ट्रम्प यांना पराभूत करण्यासाठी त्यांच्याकडे कोणती स्ट्रटेजी आहे, याची माहिती सांगतील.
ट्रम्प यांच्यावर हल्ला
अमेरिकेत राजकीय हिंसाचाराला जागा नाही. डोनाल्ड ट्रम्प जेव्हा अमेरिकेबद्दल बोलतात तेव्हा असे वाटते की, अमेरिका हा एक विघटन करणारा देश आहे. ते जगात अमेरिकेची प्रतिमा मलिन करतात, असा गंभीर आरोप जो बायडेन यांनी केला. ट्रम्प यांच्या आधीच्या कार्यकाळापेक्षा अमेरिका आता अधिक समृद्ध आणि सुरक्षित आहे. बायडेन म्हणाले की, त्यांचा पक्ष लोकशाही टिकवण्यासाठी लढत आहे. 2020ची निवडणूकसुद्धा याच कारणासाठी लढवली होती, असे बायडेन म्हणाले.
हिलरींकडून हॅरीस यांचे कौतुक
माजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांनी पक्षाच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरीस यांचे तोंडभरून कौतुक केले. कमला हॅरीस राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्या देशाला नेहमीच पुढे घेऊन जातील. त्या चांगल्या पगाराच्या नोकऱयांची व्यवस्था करतील. अमेरिकेत गर्भपाताचे अधिकार लागू करतील, असेही हिलरी यांनी या वेळी म्हटले. हिलरी क्लिंटन यांनी 2016 मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. परंतु त्या पराभूत झाल्या होत्या.