कमला मिल आग प्रकरण; सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांची बदली

सामना ऑनलाईन । मुंबई

कमला मिलमधील भीषण आगीप्रकरणी पाच अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांची बदली करण्यात आली असल्याची घोषणा आज पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्थायी समितीमध्ये केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आजपासून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कमला मिल अग्निकांडाचे तीव्र पडसाद आजच्या स्थायी समितीमध्ये उमटणार याची खात्री असल्यामुळेच पालिका आयुक्तांनी आज सभेच्या सुरुवातीलाच या दुर्घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची घोषणा केली. गुरुवारी मध्यरात्री आग लागल्यानंतर आगीचे गांभीर्य वाढल्यामुळे रात्रीच रुग्णालयात जाऊन व घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर लगेचच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या घटनेला जबाबदार कोण आहेत त्याचा प्राथमिक आढावा घेतला. त्याआधारे ही कारवाई केली असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. या पाच अधिकाऱ्यांची दुसऱ्या वॉर्डांमध्ये बदली झालेली असून त्यांनी त्यांच्या कार्यकाळात दिलेल्या परवानग्यांच्या आधारे त्यांच्यावर हा ठपका ठेवण्यात आला आहे.

यांच्यावर कारवाई
प्राथमिक माहितीच्या आधारे आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे सकृत्दर्शनी आढळून आलेल्या ‘जी दक्षिण’ विभागातील पाच अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
– इमारत व कारखाने खात्याचे पदनिर्देशित अधिकारी मधुकर शेलार
– दुय्यम अभियंता दिनेश महाले
– कनिष्ठ अभियंता धनराज शिंदे
– वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बडगिरे
– सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी एस. एस. शिंदे या पाच अधिकाऱयांना तत्काळ निलंबित करण्यात आले
– सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचीही माहिती आयुक्तांनी दिली.

जी-दक्षिणच्या सहाय्यक आयुक्तपदी देवेंद्र जैन
जी-दक्षिणच्या सहाय्यक आयुक्तपदी के-पूर्वचे वॉर्ड अधिकारी देवेंद्र जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कमला मिल आगीमुळे जी-दक्षिणचे वॉर्ड अधिकारी प्रशांत सपकाळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यामुळे रिक्त झालेल्या जागी जैन यांची तातडीने नियुक्ती करण्यात आली आहे. जैन यांनी यापूर्वी दादर-माहीममध्ये जी-उत्तर आणि मालाडमधील पी-उत्तर या विभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणून काम केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या