एक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी यांची विनंती

सामना प्रतिनिधी । मुंबई

2007 साली दिवंगत रंगकर्मी दामू केंकरे भरपावसात याच यशवंत नाट्य संकुलाबाहेर प्रायोगिक नाट्यगृहाची मागणी करीत होते. आज एक तप उलटून गेलंय. काहीच झालं नाही. नाट्य परिषदेने एक वर्ष संमेलन नाही घेतले तरी चालेल, पण प्रायोगिक रंगमंचासाठी एक वर्ष अर्पण करावे, हक्काचे प्रायोगिक नाट्यगृह उभारावे आणि त्याला ‘दामू केंकरे प्रायोगिक रंगभूमी’ असे नाव द्यावे, अशी कळकळीची विनंती ज्येष्ठ समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांनी आज केली. नाडकर्णी यांना नाट्य परिषदेच्या ‘जीवनगौरव’ पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. त्यावेळी नाडकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

नाट्य परिषदेच्या विविध पुरस्कारांचे वितरण आज यशवंत नाट्यसंकुल येथे पार पडले. यावेळी नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि 51 हजार रुपये असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. प्रकृतिअस्वास्थ्यतेमुळे दया डोंगरे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. नाट्य समीक्षकाचा पुरस्कार दैनिक ‘सामना’चे स्तंभलेखक क्षितिज झारापकर यांना ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सेन्सॉरच्या कचाट्यातून नाटकाची सुटका

नाटकाला सेन्सॉरच्या चौकटीतून मुक्त करण्याचे संकेत विनोद तावडे यांनी दिले. नाटकाला सेन्सॉर नको. एखादे नाटक रंगमंचावर आल्यास काही हरकती उपस्थित झाल्या तर नाटकाची समीक्षा करून सेन्सॉरचा निर्णय घ्यावा या दृष्टीने शासन विचार करीत आहे, असे विनोद तावडे यांनी जाहीर केले.

‘जोपर्यंत नाट्य समीक्षकाची शाब्बासकी मिळत नाही तोपर्यंत सारे फुकट’, असे 139 वर्षांपूर्वी अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी ‘शाकुंतल’ मध्ये लिहून ठेवले होते. हे कळायला नाट्य परिषदेला इतकी वर्षे लागली. माझ्यासारख्या समीक्षकाला ‘जीवनगौरव दिलाय. नाट्य परिषद सुधारतेय, अशी कोपरखळी कमलाकर नाडकर्णी यांनी मारली.

नाट्यगृहांच्या नूतनीकरणासाठी नाट्य परिषदेची एनओसी घ्यावी – प्रसाद कांबळी

नाट्यगृहांची उभारणी किंवा नूतनीकरण करताना नाट्य परिषदेच्या तज्ज्ञ समितीचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेतले जावे. हे प्रमाणपत्र राज्य सरकारने वा महानगरपालिकांनी ग्राह्य धरावे अशी मागणी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली.