कमलाबाईंची लंडनची सून- प्रीती देव, रुचिरा विदेशिनी

174

<< रविवारची भेट – भक्ती चपळगावकर >>

‘समाधानाचा जन्म स्वयंपाकघरातून होतो’ असं म्हणत कमलाबाई ओगले लाखो मराठी मुलींच्या सासूबाई झाल्या. त्यांच्या मृत्यूनंतरही ‘रुचिरा’ या पुस्तकाच्या रूपानं त्या आजही मराठी घराघरात किंवा असं म्हणायला हरकत नाही की, स्वयंपाकघरात राहत आहेत. अशीच त्यांची एक सून प्रीती देव राहते साहेबाच्या देशात, इंग्लंडमध्ये, पण मनानं इथेच आहे. परदेशातलं जेवण खाऊन कंटाळलेल्या प्रीतीनं एक दिवस रुचिराचं पान उघडलं. कमलाबाईंनी तिचा असा ताबा घेतला की, प्रीती झाली ‘रुचिरा विदेशिनी’! कमलाबाईंच्या रेसिपीज करायच्या आणि त्या ‘रुचिरा विदेशिनी’ या नावाने ब्लॉगवर पोस्ट करायच्या असा उपक्रम तिने सुरू केला. या ब्लॉगने तिच्या आयुष्याला नवीन वळण दिलं. आज अनेक जणी तिचा ब्लॉग फॉलो करतात. हा ब्लॉग म्हणजे बदललेल्या तंत्रज्ञानाच्या रूपाने कमलाबाईंच्या कर्तृत्वाला केलेला सलाम आहे. रुचिरामधल्या सगळ्या पाककृती करून बघण्याचं तिने ठरवलं आहे.

 ‘रुचिरा विदेशिनी’चा जन्म कसा झाला? – मी लहान असताना मला ना खाण्यापिण्याची फारशी आवड होती ना स्वयंपाकाची, पण माझ्या आईला स्वयंपाक करायची, विशेषत: बेकिंग करायची खूप आवड होती. मी जरी जन्मानं मराठी असले तरी माझं सुरुवातीचं आयुष्य कोलकात्यात गेलं. पुढे काही दिवस मी पुण्यात राहिले, पण स्वयंपाक म्हणजे कूकर लावणं आणि फोडण्या देणं एवढंच मर्यादित होतं. दहा वर्षांपूर्वी आम्ही लंडनला स्थलांतर केलं. इथे जेवणासाठी काही काळ रेस्टरॉंट आणि डब्यांवर अवलंबून राहिलो, पण त्याची शिसारी आली. मग ठरवलं की, काहीही करून आपण आपला स्वयंपाक करायचा आणि पोट भरायचं. माझ्या एका मैत्रिणीने मला लग्नाच्या केळवणात ‘रुचिरा’ पुस्तक भेट म्हणून दिलं होतं.

 हो, आपल्या घराघरात लग्नसंसार सुरू व्हायच्या आधी कोणी ना कोणी ‘रुचिरा’ पुस्तक भेट म्हणून देतंच. – आणि त्याचा असा उपयोग होतोच. तर मी एके दिवशी इंग्लंडच्या थंडीत ‘रुचिरा’ हातात घेतलं आणि पहिलाच पदार्थ केला गोडाचा शिरा म्हणजे याआधी मी शिरा केला नव्हता किंवा आईनं केलेला खाल्ला नव्हता असं नाही काही, पण पुस्तकात बघून पध्दतशीरपणे केला. तो ब्लॉगवर टाकला आणि ‘रुचिरा विदेशिनी’चा जन्म झाला. लहानपणी कोलकात्यात असताना खूप रवींद्र संगीत ऐकलं. त्यापैकी एक गाणं `आमी चिनी गो चिनी तोमारे ओ गो बिदेशिनी’ हे गाणं खूप आवडायचं. त्यातल्या ‘बिदेशिनी’ शब्दावरून ‘विदेशिनी’ हे नाव ‘रुचिरा’सोबत जोडलं.

 या ब्लॉगचं स्वरूप सांग ना… – आयसिंग केक्स नावाने मी बेकिंगवर ब्लॉग लिहीतच होते. कारण माझ्या आईला बेकिंगची आवड होती. तिच्यामुळे मीही थोडंफार बेकिंग करत असे. इंग्लंडमध्ये आल्यावर केकचे खूप सुंदर प्रकार बघितले, चाखले. त्यावरचं डेकोरेशन, आयसिंग बघून आपण ते शिकावं असं प्रकर्षानं वाटू लागलं. त्यात मी डिप्लोमा घेतला. माझी एक मैत्रीण अनालीज एक ब्लॉग लिहीत होती. मेरी बेरी या प्रसिध्द शेफच्या रेसिपीजवर आधारित तो ब्लॉग होता. तिच्यासारखं आपण कमलाबाईंच्या रेसिपी ब्लॉगवर टाकायचं मी ठरवलं, पण हे तंत्रज्ञान नवं होतं. मग मी इंग्लंडमधल्या काही ब्लॉगर्सना भेटले. त्यांनी मला रेसिपीजचा ब्लॉग कसा लिहायचा, फोटो कसे काढायचे याबाबत चांगली माहिती दिली. कमलाबाईंच्या पाककृती करताना त्या कशा करत असतील, कोणत्या विचारांनी करत असतील याचा विचार करत मी या रेसिपीज करते. हे सुरू करायच्या आधी मी एका दिव्यांग मुलांच्या शाळेत काम करत होते. दिवसभर कामाचा प्रचंड ताण यायचा. घरी स्वयंपाकघरात आलं की, आज कोणती पाककृती करायची आहे असा विचार करताना दिवसभराचा शीण निघून जायचा.

 कमलाबाई फक्त पुस्तक रूपानंच तुझ्या साथीला आहेत, पण हा ऋणानुबंध जन्मभरासाठी तुझ्या साथीला असेल ना. – हो, मी माझ्या मैत्रिणीच्या अनालीजच्या ब्लॉगबद्दल सांगितलं ना, त्या अनालीजने दोन वर्षे मेरी बेरीच्या पाककृती बनवण्याचं चॅलेंज स्वीकारलं होतं. तिनं हे आव्हान यशस्वीरीत्या पेलल्यानंतर तिची एका स्थानिक वाहिनीवर मुलाखत झाली. त्या मुलाखतीसाठी स्वत: मेरी बेरी आल्या होत्या. मी त्यांचा कार्यक्रम बघितला आणि मला प्रकर्षानं कमलाबाईंची आठवण आली. मनात विचार आला, ‘कमलाबाई, तुम्हाला मला भेटायचंय, दाखवायचंय की, मी तुमच्या पाककृती कशा बनवते ते! ज्या काळी घरोघरी ओव्हन नसायचं त्या काळी कमलाबाईंनी विस्तवावर बेकिंगचे प्रयोग केले. माझ्या जवळ तर सगळी साधनं होती, पण तरी मी कमलाबाईंनी सांगितलेल्या सगळ्या सूचना पाळून पाककृती करत होते. मला त्यांना सगळं सगळं सांगायचं होतं आणि गंमत सांगू का, त्याच काळात मला ऑस्ट्रेलियातून कमलाबाईंच्या पणतीचा मेसेज आला. तिनं सांगितलं की, तिच्या आजीला म्हणजे कमलाबाईंच्या मुलीला, उषाताईंना माझ्याशी बोलायचंय. त्यांना माझ्या ब्लॉगची माहिती मिळाली होती. मला किती आनंद झाला, काय सांगू! माझ्या आयुष्यातला हा खूप महत्त्वाचा क्षण होता. उषाताईंनी माझ्याशी मनसोक्त गप्पा मारल्या. या गप्पांनंतर काही महिन्यांतच उषाताईंचं निधन झालं, पण त्यांच्याशी मारलेल्या गप्पा माझ्यासाठी नेहमीसाठीचा ठेवा आहे.

 तू जे पदार्थ करतेस, त्याचे घटक तुला  कुठून मिळतात? आज तुझ्या ब्लॉगवर तू उसाच्या साराची रेसिपी टाकली आहेस. – विचारू नकोस, इथल्या इंडियन स्टोअरवर मी नजर ठेवून असते. आता आपली संक्रांत साजरी झाली, त्याच काळात पंजाब्यांच्या बैसाखीसाठी हिंदुस्थानातून ऊस आला की, मी तो विकत घेते. पालेभाज्या हा प्रकार इथे मिळत नाही, पण बाकी अनेक पदार्थ मिळतात. कडधान्य, धान्ये मिळतात. वाळवणं करायचा प्रश्न नाही. कारण पाऊस पाचवीला पुजलेला. एकदा हवामान खात्यानं सांगितलं की, उष्णतेची लाट येणार आहे. माझ्या वास्तव्यात याचवेळी मी सलग ऊन बघितलं. संधीचा पुरेपूर फायदा घेऊन मी कुरड्या-पापड्या केल्या, पण काही गोष्टी, उदाहरणार्थ कवठ पाहून जमाना झालाय. कवठाची चटणी करायची आहे. आता पुढच्या खेपेला हिंदुस्थानात आले की, अशा गोष्टी विकत घेऊन ठेवणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या