शाकाहाराचे पालन करणारे कनाशी गाव, 850वर्षांपासून होतेय परंपरेचे पालन

श्रावण महिन्यात मांसाहार केला जात नाही. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यामधील कनाशी गावात तब्बल 850 वर्षांपासून वर्षभर मांसाहार न करण्याची परंपरा आजतागायत सुरू आहे. या गावात कोणालाही मद्याचे व्यसन नाही. तीन हजार लोकवस्ती असलेल्या गावात बकऱ्या, कोंबड्याही पाळल्या जात नाहीत. मांसाहार आणि मद्यपानापासून दूर असलेले कनाशी  हे राज्यातील एकमेव गाव असल्याचा दावा ग्रामस्थ करतात.

कनाशी गावाला महानुभाव पंथाच्या उपासनेची साडेआठशे वर्षांची परंपरा आहे. गावात विविध जातीधर्माचे लोक राहतात. तरीही कोणी मांसाहार, मद्यपान करत नाही. चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली असल्याने महानुभव पंथाचे आचारविचार सगळ्या गावकऱयांनी स्वीकारले आहेत. मांसाहाराला कारण असलेले प्राणी म्हणजेच काsंबडी, बकरीसुद्धा गावात पाळली जात नाही. भिन्न आचारविचार असलेली माणसे गावात असूनही सर्वांचे शाकाहाराबाबत मात्र एकमत आहे. गावात लग्न करून आलेल्या सुना मांसाहार करणाऱया असतील, तर त्याही शाकाहारी होतात. प्रत्यक्षात मांस कसे असते आणि अंडी कशी असतात, हेसुद्धा पाहिले नसल्याचे गावकरी सांगतात, तेव्हा आश्चर्य वाटते.