कांदिवली गोळीबार प्रकरण, फरार झालेल्या आरोपीला उत्तर प्रदेशात पकडले

कांदिवली येथील गोळीबारप्रकरणी कांदिवली पोलिसांनी अखेर उत्तर प्रदेशात पळून गेलेल्या आरोपीला पकडले. रोहित असे त्या आरोपीचे नाव असल्याचे समजते. अनैतिक संबंधातून त्याने मनोजसिंह चौहाण या इमिटेशन ज्वेलरी मालकाची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

मनोजसिंह चौहाण कांदिवलीतील लालजीपाडा परिसरात राहत होता. मनोज रविवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास केस कापण्यासाठी जात असताना एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर देशी बनावटीच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. त्यातील एक गोळी डोक्यात लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. गोळीबारानंतर मारेकऱयाने तेथून पोबारा केला. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद करून कांदिवली पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, रोहित नावाच्या व्यक्तीने हा गोळीबार करून तो पवन एक्स्प्रेसने उत्तर प्रदेशला पळून गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कांदिवली पोलिसांनी उत्तर प्रदेश रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्याला प्रयागराज रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. त्याला पुढील चौकशीसाठी कांदिवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रोहित हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्याविरुद्ध उत्तर प्रदेशात काही गुह्यांची नोंद असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते