कांदिवलीत तरुणाची भररस्त्यात हत्या, हत्येचे कारण अस्पष्ट, आरोपी पसार

कांदिवली पश्चिमेकडील लालजी पाडा परिसरात आज सकाळी एका तरुणाची भररस्त्यात हत्या करण्यात आली. गोळी झाडून ही हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून हत्या करून आरोपी पसार झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून कांदिवली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मनोज चौहान (32) असे मृत तरुणाचे नाव आहे. मनोज हा लालजी पाडा येथील गणेश नगरात राहत होता. तसेच तो इमिटेशन ज्वेलरीचे काम करीत होता. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तो परिसरातून जात असताना पाठीमागून आलेल्या व्यक्तीने त्याची हत्या केली आणि घटनास्थळावरून पोबारा केला. हा प्रकार कळताच कांदिवली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी इस्पितळात पाठवला आहे. याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू असल्याचे उपायुक्त संजय बन्सल यांनी सांगितले आहे. हत्येमागचे कारण मात्र समजू शकले नाही.