केन विल्यमसनचा डबल धमाका, न्यूझीलंडचा 519 धावांचा डोंगर

कर्णधार केन विल्यमसनच्या शानदार द्विशतकाच्या जोरावर न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाने येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱया दिवशी 7 बाद 519 धावांचा डोंगर उभारला. केन विल्यमसनने 412 चेंडूंत 2 षटकार व 34 चौकारांसह 251 धावांची जबरदस्त खेळी साकारली. न्यूझीलंडने डाव सोडल्यानंतर वेस्ट इंडीजने दिवसअखेर बिनबाद 49 धावा केल्या. आता त्यांचा संघ 470 धावांनी पिछाडीवर आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत ही मालिका खेळवण्यात येत आहे.

न्यूझीलंडने 2 बाद 243 या धावसंख्येवरून शुक्रवारी पुढे खेळायला सुरुवात केली. केन विल्यमसनने खेळाची सूत्रे स्वतःच्या हातामध्ये घेत वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. त्याने 251 धावांची खेळी साकारल्यामुळे न्यूझीलंडचा धावांचा पाऊस पाडता आला. टॉम लॅथमने 86 धावांची, रॉस टेलरने 38 धावांची, काईल जेमीसनने नाबाद 51 धावांची खेळी केली. वेस्ट इंडीजकडून यावेळी 47 अवांतर धावा देण्यात आल्या. केमर रोचने 114 धावा देत 3 आणि शॅनोन गॅब्रीयलने 89 धावा देत 3 फलंदाज गारद केले. वेस्ट इंडीजकडून क्रेग ब्रेथवेट (नाबाद 20 धावा) व जॉन कॅम्पबेल (नाबाद 22 धावा) हे सलामीवीर खेळपट्टीवर ठाण मांडून आहेत.

या आकडेवारीवर एक नजर

केन विल्यमसनने या डावात 251 धावा करीत कसोटीतील सर्वोत्तम खेळी साकारली. हे त्याचे तिसरे द्विशतक ठरले. तसेच गेल्या दोन वर्षांतील दुसरे द्विशतक ठोकण्यात त्याला यश लाभले.

न्यूझीलंडकडून एका डावात 250 धावांचा टप्पा ओलांडण्याची ही नववी खेप. एका डावात 250 धावांचा टप्पा पूर्ण करणारा केन विल्यमसन न्यूझीलंडचा आठवा फलंदाज ठरलाय. स्टीफन फ्लेमिंगने दोन वेळा अशी करामत करून दाखवलीय.

केन विल्यमसनने 624 मिनिटे खेळपट्टीवर उभे राहून 251 धावा फटकावल्या. दहा तासांच्या वर खेळपट्टीवर उभे राहण्याची केन विल्यमसनची ही दुसरीच खेप. तसेच अशी कामगिरी करणारा तो न्यूझीलंडचा एकमेव फलंदाज ठरलाय.

आपली प्रतिक्रिया द्या