IPL 2023 केन विलियम्सन आयपीएलमधून बाहेर, गतविजेत्या गुजरात टायटन्सला तगडा धक्का

इंडियन प्रीमिअर लीगच्या 16व्या हंगामाची शुक्रवारी सुरुवात झाली. पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेत्या गुजरात टायटन्समध्ये रंगला. गुजरातने हा सामना जिंकत स्पर्धेची झोकात सुरुवात केली. मात्र या विजयाचा जल्लोष उतरत नाही तोच गुजरातला मोठा धक्का बसला. गुजरातचा आघाडीचा खेळाडू आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन हा संपूर्ण स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो स्पर्धेतील आगामी सामने खेळू शकणार नाही असे वृत्त आहे. गुजरातने 2 कोटी रुपये मोजून त्याला आपल्या संघात घेतले होते.

शुक्रवारी सलामीच्या लढतीत गुजरातने चेन्नईचा 5 विकेट्सने पराभव केला. या लढतीमध्ये केन विलियम्सन याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. चेन्नईची फलंदाजी सुरू असताना 13व्या षटकात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती.

चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने मारलेला जोरदार फटका रोखण्याचा प्रयत्न सीमारेषेवर तैनात असणाऱ्या विलियम्सन याने केला. उडी मारून चेंडू अडवताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. यामुळे तो मैदानातच कळवळताना दिसला.

गुजरातच्या वैद्यकीय पथकाने तात्काळ मैदानात धाव घेतली. यानंतर त्याला खांद्याचा आधार देऊन मैदानाबाहेर नेण्यात आले. त्यानंतर तो क्षेत्ररक्षण करतानाही दिसला नाही. तसेच धावांचा पाठलाग करताना मैदानात फलंदाजीसाठी उतरला नाही. आता त्याची दुखापत गंभीर असून तो संपूर्ण स्पर्धेला मुकणार असल्याचे कळते. आज तकने याबाबत वृत्त दिले आहे.

गुजरातचा विजय

आयपीएल सोळाचा पहिला दिवस गतविजेत्या गुजरात जायंट्ससाठी शुभ ठरला. शुभमन गिलच्या 63 धावा आणि मधल्या फळीतील फलंदाजांच्या छोटय़ा पण उपयुक्त खेळींच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जचा 5 विकेट्स आणि 4 चेंडू राखून पराभव केला. चेन्नईच्या 179 धावांचा पाठलाग करताना गुजरातला शुभमन आणि वृद्धिमान साहाने 37 धावांची सलामी दिली. त्यानंतर शुभमनने 36 चेंडूंत 63 धावा ठोकत गुजरातला विजयपथावर आणले. मग मधल्या फळीतील विजय शंकर, राहुल तेवतिया आणि राशिद खानने दमदार खेळ करीत 4 चेंडूआधीच विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याअगोदर ऋतुराज गायकवाडच्या 50 चेंडूंतील 92 धावांच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने 7 बाद 178 धावा केल्या. त्याने या खेळीत 9 षटकार आणि 4 चौकारांचा वर्षाव केला.