मुलाखतीतील फोलपणा उघड झाल्याने संताप, कंगनाची आता पत्रकारांना धमकी

kangana

मी भाजपच्या उमेदवाराला मतदान करणार होते, पण नाइलाजास्तव शिवसेनेला मतदान करावे लागले असे अश्रू ढाळणाऱया कंगना राणावतचा फोलपणा उघड झाला आहे. त्यामुळे संतापलेल्या कंगनाने आता पत्रकारांनाच धमक्या देण्यास सुरुवात केली असून तुम्हाला कायदेशीर नोटीसच पाठवते असे ट्विट तिने केले आहे.

एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने शिवसेनेवर वाट्टेल ते आरोप तर केलेच पण मी शिवसेनेला जबरदस्तीने मतदान केले. मला भाजपला मत देण्याची इच्छा होती असे तिने बेधडक सांगितले. तिच्या या दाव्यातील फोलपणा पत्रकार कमलेश सुतार याने उघड केला आहे.

कंगना खारमध्ये राहते. म्हणजेच तिचा विधानसभा मतदारसंघ वांद्रे पश्चिम येतो. 2019च्या निवडणुकीत येथून भाजपचे आशिष शेलार तर लोकसभेला (उत्तर-पश्चिम मतदारसंघ) भाजपच्याच पुनम महाजन निवडणुकीसाठी उभ्या होत्या. 2014मध्ये शिवसेना-भाजप युती होती. तेव्हाही लोकसभेसाठी भाजपच्या पुनम महाजनच होत्या. त्यामुळे शिवसेनेला जबरदस्तीने मतदान केले हा कंगनाचा दावा सुतार यांनी खोडला.

कंगना संतापली

कमलेश सुतार यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचे गणित मांडूनच कंगनाला खोटे पाडल्याने ती प्रचंड संतापली आहे. तिने ट्विट करून सुतार यांना थेट धमकीच दिली. मला लोकसभा निवडणुकीबद्दल म्हणायचे होते, तुम्ही खोटी माहिती पसरवू नका. तुम्हाला आता कायदेशीर नोटीसच पाठवते. तुम्हाला तुरुंगात खडी फोडायला जावे लागेल अशी धमकी कंगनाने दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या