‘कंगनासोबत पंगा करशील, तर बुडशील’; दिग्दर्शकाने केला खुलासा

921

अभिनेत्री कंगना रणौत तिच्या जबरदस्त भूमिकांमुळे नेहमीच इतर अभिनेत्रींहून वेगळी ठरते. क्वीन, तन्नु वेड्स मन्नु, मणिकर्णिका अशा चित्रपटातून लोकप्रिय झालेल्या कंगनाचा पंगा हा जबरदस्त चित्रपट येऊ घातला आहे. या चित्रपटात ती कबड्डीत पुनःपदार्पण करणाऱ्या एका कबड्डीपटूची भूमिका साकारत आहे.

या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट आणि कंगना यांच्याविषयी पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यातच पंगा या चित्रपटाच्या दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी यांनी कंगनासोबत चित्रीकरणाचा अनुभव एका मुलाखतीत सांगितला आहे. मणिकर्णिकाच्या वेळी कंगनाच्या सेटवरील वादांविषयी बरंच बोललं जात होतं. त्या तुलनेने पंगा या चित्रपटात कथा आणि चित्रपटाविषयी बोललं जात आहे. त्यामुळे कंगनासोबतच्या सेटवरील अनुभवांविषयीचे काही प्रश्न या मुलाखतीत अश्विनी यांना विचारण्यात आले.

ashwini-iyer-tiwari

तेव्हा त्यांनी कंगना सोबतचे आणि पंगाविषयीचे अनुभव सांगितले. अश्विनी म्हणाल्या की, मी जेव्हा या चित्रपटाची घोषणा केली तेव्हा मला सोशल मीडियापासून ते वैयक्तिक ओळखींपर्यंत अनेकांनी कंगनाबद्दल सांगितलं. कंगनासोबत चित्रपट करशील तर बुडशील असाही सल्ला दिला. मी विचार केला की, मुळात वैयक्तिक नाती आणि व्यावसायिक नाती ही वेगवेगळी असतात. कंगना ही अतिशय उत्तम अभिनेत्री आहे. तिने ही व्यक्तिरेखा जशी साकारली आहे, तसं कुणीच साकारू शकलं नसतं. कारण, मला वाटतं की अशी धाडसी वृत्ती तिच्यात उपजतच आहे. त्यामुळे मला तिच्यासोबत काम करताना कोणतीही अडचण आली नाही, हे खरं, असं स्पष्टीकरण अश्विनी अय्यर तिवारी यांनी दिलं आहे.

या चित्रपटात एकेकाळी कबड्डीपटू पण लग्नानंतर संसार, मूल हे सगळं सांभाळत गृहिणी झालेल्या आणि कबड्डीत पुन्हा पदार्पण करण्याची इच्छा असलेल्या जया निगम नावाच्या महिलेची भूमिका कंगना साकारत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून या प्रवासाची एक झलक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या चित्रपटासाठी कंगनाने वजन वाढवलं असून ती कबड्डीचे डावपेचही शिकली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत जस्सी गिल, रिचा चढ्ढा, नीना गुप्ता अशी दमदार स्टारकास्ट आहे. नील बट्टे सन्नाटा आणि बरेली की बर्फी सारखे वेगळे चित्रपट देणाऱ्या अश्विनी अय्यर तिवारी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट 24 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या