कंगनाने केले पालिका अधिकार्‍यांसह संजय राऊत यांना प्रतिवादी

कंगना राणावत हिने तिच्या कार्यालयावर कारवाई करणाचे आदेश देणारे महानगरपालिका अधिकारी यांच्यासह शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना प्रतिवादी करण्याची विनंती आज उच्च न्यायालयाला केली. आज बुधवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

कंगनाने आपल्या कार्यालयात बेकायदा बांधकाम केले होते. त्यावर महानगरपालिकेने कारवाई केली होती. ती कारवाई बेकायदेशीर होती. त्या बदल्यात महापालिकेने आपल्याला 2 कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी कंगनाची मागणी आहे. आज या प्रकरणावर न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी कंगनाने वॉर्ड ऑफिसर भाग्यवंत लते आणि संजय राऊत यांना प्रतिवादी करण्याची मागणी केली. कंगनाच्या वतीने अॅड बिरेंद्र सराफ यांनी बाजू मांडली. कारवाईदरम्यान अभिनेत्री कंगनावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली असून धमकवल्याचा आरोप सराफ यांनी केला. त्यासंदर्भातील डीव्हीडीही त्यांनी खंडपीठासमोर सादर केली. हा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने सांगितले की, जर ही डीव्हीडी बनावट असेल अथवा खासदार राऊत यांच्यावरील हे आरोप खोटे असतील तर त्यांनी आपली बाजू कोर्टापुढे निश्चितच मांडायला हवी. त्यामुळे हायकोर्टाने याप्रकरणी खासदार संजय राऊत यांना प्रतिवादी करण्याचे आदेश दिले. 

मुंबई, महाराष्ट्रासाठी लढण्यापासून कुणीही रोखू शकत नाही

बाबरी खटल्यापासून ते मराठी अभिमानासाठी उभे राहण्यापर्यंतचे अनेक खटले मी अंगावर घेतले आहेत. मला माझे शहर आणि महाराष्ट्राच्या अभिमानासाठी लढण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.’ अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या